ही निवडणूक खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी सत्वपरीक्षा.
सुरेश इंगळे, नाशिक
सिन्नर विधानसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या पुन्हा एकदा चर्चेमध्ये असल्याचा दिसत आहे. या मतदारसंघांमध्ये पक्षाला एवढे महत्त्व नसून नेता आणि गट याला महत्व आहे. सिन्नर मतदार संघाच्या राजकारणामध्ये गेल्या तीन निवडणुकांमध्ये राजाभाऊ वाजे आणि माणिकराव कोकाटे हेच एकमेकांचे विरोधात उमेदवार असायचे, परंतु यावर्षी तसे नसून त्यात नव्या नेतृत्वाला संधी शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामध्ये नवा उमेदवार कोण असेल यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ही निवडणूक खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी सत्वपरीक्षाच असेल. कारण या वेळेस सिन्नर मतदार संघामध्ये यंदा तिरंगी लढत असेल, त्यात महायुतीचे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे हे असतील आणि उदय सांगळे यांनी आपला अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीला उभे राहण्याचा निर्णय घेत या विधानसभेला आपले नशीब आजमावणार आहेत. तसे जो पक्ष उमेदवारी देईल तिकडे जाण्याची त्यांची तयारी आहे. परंतु उदय सांगळे यांना जर पक्षाकडून उमेदवारी मिळाली नसल्यास तिसरा उमेदवार कोण असेल हा सध्या सर्वच राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा प्रश्न निर्माण होत आहे. या सर्व राजकीय घडामोडी मध्ये सर्व निर्णय खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे असणार आहेत. या संदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाजे यांनी लोकसभा निवडणुकीची परतफेड म्हणून सिन्नर मतदार संघ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्याचे संकेत दिले आहेत.
आमदार कोकाटे यांनी गेल्या काही महिन्या पासून बरीच काही जमवाजमव केलेली दिसत आहे. तसेच स्थानिक नेत्यांशी सुद्धा राजकीय संघर्ष टाळलेले आहे. तेवढेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत निधींचा तर पाऊसच पाडलेला आहे, त्यामुळे त्यांनी आपले स्थान बळकट करून ठेवले आहे. येत्या 30 सप्टेंबरला आमदार कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिन्नरला येण्याचे आमंत्रण दिले आहे. उपमुख्यमंत्री पवार यांचा हा सिन्नर दौरा झाल्यास आमदार कोकाटे यांच्या उमेदवारीची घोषणा करतील.
आमदार माणिकराव कोकाटे हे महायुतीचे उमेदवार असून महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे अस्तित्व हे सिन्नर तालुक्यातील एका समाजापुरते च मर्यादित आहे. त्यात उदय सांगळे यांनी जर अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यास भाजपचे अस्तित्व किती असा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे आमदार कोकाटे यांना आव्हान देऊ शकेल असा सध्या तरी एकही उमेदवार महायुतीमध्ये नाही आणि महाविकास आघाडीची सुद्धा हीच परिस्थिती आहे सध्या महायुतीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, राजाराम मुरकुटे, एडवोकेट संजय सोनवणे, हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात माजी आमदार सूर्यभान गडाख यांचे चिरंजीव राजेश गडाख, आमदार कोकाटे यांचे बंधू भरत कोकाटे, आणि माजी सभापती बाळासाहेब वाघ, रवींद्र पवार, अरुण वाघ यांची नावे सध्या चर्चेमध्ये आहेत.
चर्चेमध्ये असलेल्या इच्छुकांनी दोन महिने अगोदरच निवडणूक लढण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये कोणाची किती तयारी आहे आणि मतदारसंघ कोणाला स्वीकारेल हे सांगणे कठीण आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघाची सर्व राजकीय सूत्रे खासदार वाजे यांच्याकडे असल्याने अशा स्थितीत श्री वाजे यांना मनापासून सिन्नर मतदारसंघ ताब्यात घ्यायचा असल्यास आमदार कोकाटे यांना आव्हान देऊ शकेल असा उमेदवार द्यावा लागेल. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राज्यातील राजकीय कल पाहता सिन्नरमध्ये परिवर्तन करायचे असल्यास, खासदार वाजे यांच्या पत्नी दीप्ती वाजे यांना सुद्धा उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे या निवडणुकीत नेमका काय निर्णय होतो याकडे सगळ्यांची उत्सुकता वाढलेली आहे.

