सामाजिक

मुंबई-गोवा महामार्गावर गणेशभक्तांना मोफत चहा, पाणी व आरोग्य सुविधा !

रामेश्वर कन्स्ट्रक्शन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग यांचा सयुक्त उपक्रम

प्रतिनिधि, पेण

यावर्षी मुंबई गोवा महामार्गावर गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्याकरीता सुविधा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. या सुविधा केंद्रात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्त व चाकरमान्यांकरिता मोफत चहा पाणी व आरोग्य सुविधेची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग व रामेश्वर कंस्ट्रक्शन पेण यांच्या संयुक्त पेण तालुक्यातील खारपाले, रोहा तालुक्यातील वाकण येथे निवारा शेड उभारून गणेश भक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रामेश्वर कन्स्ट्रक्शन पेण यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर जवळील रातवड येथेही निवारा शेड उभारून  गणेशभक्तांना मोफत चहा बिस्कीट व मिनरल वॉटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याच बरोबर ज्या गणेशभक्तांच्या गाड्या पंचर झाल्या असतील अशा गाड्यांचे मोफत पंचर या ठिकाणी काढून मिळेल. या तीनही ठिकाणी छोट्या बालकांसाठी दूध उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच फीडिंग सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी आरोग्य विषयक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तिन्ही ठिकाणी 24 तास ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्याकरिता प्रयत्नशील असलेल्या पोलीस बांधवांकरिता या ठिकाणी विश्रांती गृह उपलब्ध करून देण्यात आले आहे. नेहमी खडतर प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई गोवा महामार्गावर एक नव्हे दोन नव्हे तर चक्क तीन – तीन ठिकाणी सुविधा केंद्र उपलब्ध करून दिल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून या सुविधा केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर पासून बुधवार दिनांक 18 सप्टेंबर पर्यंत असे एकुण 14 दिवस हे सुविधा केंद्र कार्यान्वित असतील त्यामुळे गणेश उत्सव साजरा करून परतीचा प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांनाही या सुविधा केंद्रांचा लाभ घेता येईल अशी माहिती रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचीका यांनी पत्रकारांना दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!