पेण नगरपरिषदे समोर “माझ पेण” संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन
राजेश प्रधान, पेण
पेणकरांना अनेक वर्षापासून अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. या अशुद्ध पाण्यामुळे पेणकरांना कॉलरा, टाईफाईड, डायरिया, गॅस्ट्रो, काविळ यांसारखे साथीच्या आजारांच्या रुग्नाची संख्या काही दिवसांपूर्वी कमालीची वाढली होती. त्यामुळे पेणमधील संतप्त नागरिकांनी “माझं पेण” संघटनेच्या नेतृत्वात पेण नगरपरिषदेवर मोर्चा काढून व रास्ता रोको करून आपला संताप व्यक्त केला. सदर आंदोलनात पेण शहराचे शेकडो नागरिक सहभागी झाले होते. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे यांनी सदर आंदोलनात सहभाग घेऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
पेण शहरातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात गढूळ पाण्याचा पुरवठा नळाद्वारे करण्यात येतो. तसेच पेण शहरातील गटारांचे पाणी जेथे सोडले जाते तेथुनच पाणी शुद्धिकरणासाठी उचलले जाते. मात्र सदरील शुद्धिकरण प्रकल्प हा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे पेणकरांना होणारा पाणी पुरवठा हा पिण्यायोग्य नसल्याचे अनेक तपासाअंति निष्पन्न झाले आहे. या दूषित पाण्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या. “माझं पेण” सामाजिक संस्थेने या गंभीर बाबीकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता गुरुवार २२ रोजी पालिकेवर मोर्चा काढून व रास्ता रोको करून आंदोलन केले.
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांनी पुढाकार घेऊन आवाहन केलेल्या या आंदोलनात महिला वर्ग, जेष्ठ नागरिक आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. पेणकरांना मिळत असणारे अशुद्ध आणि गटाराच्या पाण्याबाबत पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, त्याचप्रमाणे ज्या गटारांचे पाणी या पिण्याच्या पाण्याच्या प्लांट जवळ जाऊन मिळते त्याचा मार्ग बदलावा आणि शहरातील पिण्याच्या पाण्याच्या चाव्यांवर झाकणे लावण्यात यावीत. यांसह अनेक मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.
आमदार रविंद्र पाटील यांच्या पाठपुराव्यातुन पेणकरांच्या शुद्ध पाणी तसेच पुढील वीस ते पंचवीस वर्षे पुरेल असे मुबलक पाण्यासाठी आपण हेटवणे आणि आंबेगाव धरणाचे पाणी उचलणार असुन त्या योजनेसाठी १४९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे, त्याची अंतिम मंजुरी मंत्रालय स्तरावर लवकरच होईल असे स्पष्टीकरण मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी यावेळी दिले. पेण शहरात दुषित पाण्याचा पुरवठा होत नाही. हवे असल्यास पुन्हा माझं पेणच्या सदस्या समक्ष पुन्हा एकदा पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठऊ अशी भूमिका मुख्याधिकाऱ्यांनी घेतली. तसेच महिनाभरात शहरातील पाण्याच्या चाव्यांवर झाकणे टाकून ते बंदिस्त कऱण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले.
पेण शहराला गटाराचे अशुद्ध पाणी पिण्यासाठी पुरवले जाते, तसेच जो फिल्टरेशन प्लांट आहे तो योग्य काम करत नाही असा आमचा आरोप आहे. आम्ही स्वतः पिण्याच्या पाण्याचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्याचे रिपोर्ट हे पाणी पिण्यायोग्य नाही असा अहवाल आला आहे. याबाबत जिल्ह्याचे खासदार सुनिल तटकरे तसेच आमदार महेंद्र दळवी यांनी देखील मुख्याधिकर्यांना फोन करून उपाययोजना करायला सांगितले होते, मात्र त्याकडे देखील दुर्लक्ष झाल्याने आज आमच्यावर हे आंदोलन करण्याची वेळ आली आहे, यापुढे जर योग्य पाणी मिळाले नाही तर याहून तीव्र आंदोलन करण्यात येईल.