“लाडक्या बहिणींची सोय, मात्र ‘ईकडच्या’ आई – बहिणींची गैरसोय” !
आपुऱ्या परिवहन सेवेमुळे नागरिकांची गैरसोय !
अरविंद गुरव, पेण
बुधवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींच्या भेटीसाठी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील मोरबा येथे आयोजित केलेल्या लाडकी बहिण वचनपूर्ति सोहळा आणि महिला सशक्तिकरण अभियान कार्यक्रमासाठी आले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार म्हणून कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात ‘लालपरी’ची सोय करण्यात आली होती. मात्र, या सोयीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या डेपोतील बसेस तिकडे गेल्याने जिल्ह्यातील अनेक गावातील आया-बहिणींची बसेस अभावी मोठी गैरसोय झाली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आणि महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम बुधवारी माणगाव येथील मोरबा येथे पार पडला. या कार्यक्रमात महिलांची संख्या लक्षवेधी राहावी, असे आधीच ठरल्यामुळे ठिकठिकाणच्या ‘लाडक्या बहिणींना’ कार्यक्रम ठिकाणी आणण्या-नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खासगी वाहनांची आणि सुमारे ५५० बसेसची आवश्यकता अधोरेखित झाली होती. त्यानुसार, प्रमाणे रायगड विभागाकडून विभागातून २५० बसेस तर रत्नागिरी विभाग – १२० बसेस, मुंबई विभाग – ६०, ठाणे विभाग – ७० आणि पुणे विभागातून ५० अशा आणि अन्य काही जिल्ह्यातून बसेस बूक करण्यात आल्या होत्या.
या बसमधून मोरबा येणे-जाणे करणाऱ्या ‘लाडक्या बहिणींना भूक-तहान लागेल’, हेसुद्धा ध्यानात ठेवून फूड फॅकेट आणि पाण्याच्या बाटल्यांची बसमध्येच व्यवस्था करण्यात आली होती. अशा प्रकारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीद्वयांच्या भेटीसाठी आणि कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची चांगली सोय झाली. मात्र, अनेक आगारातील बसेस ‘त्या’ बहिणीच्या सोयीसाठी पाठविण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील, गावोगावच्या आया, बहिणींची मोठी गैरसोय झाली. रोजच्या प्रमाणे कामावर निघालेल्या काही महिला-पुरुष यांना पनवेल, मुंबई येथे जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने तर काही ठिकाणी बस वेळेवर न पोहोचल्याने आज त्यांची सुट्टी झाली काही उशिरा पोहोचले. तर गावाला जाण्याच्या तयारीत अनेक ठिकाणच्या आया-बहिणी बसची वाट बघत ताटकळत राहिल्या.
म्हणून वाट्याला आली प्रतीक्षा ...
गावात येणारी लालपरी बराच वेळ होऊनही गावात का नाही आली, अशी ठिकठिकाणच्या बहिणींकडून (अन् भावांकडूनही) विचारणा होऊ लागली. त्यानंतर तिकडच्या 'लाडक्या बहिणींची' काळजी घेण्यासाठी लालपरीला तिकडे पाठविण्यात आल्यामुळे ईकडे प्रतिक्षा वाट्याला आल्याचे स्पष्ट झाले.
मागील दोन तास आम्ही पनवेल यथे जाण्यासाठी एसटी ची वाट पहात उभे आहोत. मात्र एकही बस अद्याप आलेली नाही. मी सरकारी क्षेत्रात काम करीत आहे. मला आज ९ वाजता कार्यालयात पोहोचायचे होते मात्र एसटी नसल्याने आता ११:०० वाजले तरी मी अजुन पेण एसटी स्टॅंडला उभी आहे. – अनघा पाटील, प्रवासी पेण

