सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपीला २५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी.
संजय कदम, पनवेल
बॉलीवूडचा अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट रचणे तसेच त्याच्या राहत्या घरावर फायरींग करून सलमान खानला ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या टोळीतील मुख्य आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी हरियाणातील पानिपत येथून अटक केली होती. सदर आरोपीला आज पनवेल न्यायालयात हजर केले असता त्याला 25 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, सुखबिर बलबिर सिंग उर्फ सुरण्या शुटर (33 रा.पानीपत) असे या आरोपीचे नाव आहे व तो बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगतिले.
१४ एप्रिल २०२४ रोजी काही संशयित आरोपीनी सिने अभिनेता सलमान खान यांच्या मुबई येथील राहत्या घरावर फायरींग करून सलमान खान ला मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना घडल्या नंतर मुबई पोलीस तसेच नवी मुबई पनवेल पोलिसांनी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली होती. हे दोन आरोपी काही दिवस पनवेल येथे वास्तव्याला आल्याचे समोर आले होते. या दोघांच्या अटके नंतर या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी त्यावेळी पाच आरोपींना अटक केली होती. मात्र, या टोळीचा मुखींया मोस्ट वॉन्टेड आरोपी चा शोध पोलीस घेत होते. सुरण्या शुटर असे त्याचे नाव असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, तो पोलिसांना चकवा देण्यात वारंवार यशस्वी होत होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पनवेल शहर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे.
पनवेल शहर पोलिसांच्या पथकांनी हरियाणा येथील पानिपत येथून त्याला अटक केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना त्याच्याविषयी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस हवालदार किरण सोनवणे, नितीन वाघमारे यांनी पानिपत येथे जाऊन सुरण्या शुटरला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली. सुरण्या शुटर फायरींग प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. इतर सहकार्यांना पैसे, हत्यार पुरवणे त्याच्यावर जबाबदारी होती. सुरण्या शुटर याने स्वतः सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊस ची रेखी केली होती. आणि सलमानला रस्त्यातचं गाठून ठार करण्याचा प्रयत्न त्याचा होता, अशी माहिती सुद्धा मिळत आहे. दरम्यान सदर आरोपीची आज पोलीस कोठडी संपल्याने त्याला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि प्रवीण भगत यांनी पनवेल न्यायालयात हजर करून आपली बाजू मांडताना सदर आरोपीकडून इतरही आरोपींची माहिती घेणे बाकी आहे तसेच इंटरनॅशनल आरोपींशी याचे संबंध असून त्या दृष्टीने सुद्धा पुढील तपास करणे आवश्यक असल्याची त्यांनी बाजू मांडल्यावर न्यायालयाने २५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानुसार सध्या सदर आरोपी हा पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात आहे.

