पेण पोलीस ठाण्याची गुटखा विक्रीवर धडक कारवाई
६० हजार ४०१ रुपयांचा अवैध गुटखा जप्त
प्रतिनिधि, पेण
रायगड जिल्ह्यातील पेण पोलीस ठाण्याने अवैध गुटखा विक्रीवर धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी ही कारवाई केली.
पेण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी परिसरातुन गुप्त माहिती गोळा करून अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचा तपास सुरू केला. पो.हवा. प्रकाश कोकरे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दीपक राजभर नावाचा इसम आपल्या घरातून गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्री करीत आहे. या माहितीच्या आधारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने दोन पंचांसह दीपक राजभरच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात दीपक राजभर याला गुटखा विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले.
दीपक राजभर याची पंचासमक्ष चौकशी करण्यात आली असता त्याने आपले नाव दीपक रामआधार राजभर असे सांगितले. त्याच्या घराची झडती घेतली असता, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला, गुटखा आणि सुगंधित तंबाखू यासारखा मुद्देमाल आढळून आला. या छाप्यात एकूण ६० हजार ४०१ रुपयांचा अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर पो.हवा. प्रकाश कोकरे यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पेण पोलीस ठाण्यात गु.र.जि.नं. २७६/२०२४ भा.दं.वि. कलम १२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदरची कामगीरी उप विभागीय पोलीस अधिकारी, पेण शिवाजी फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक संदिप बागुल यांच्या सुचनांनुसार गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी पोसई समद बेग, सहा. फौजदर राजेश पाटील, पोह. संतोष जाधव, पोह. राजेंद्र भोनकर, पोह. प्रकाश कोकरे, पोह. अजिंक्य म्हात्रे, पोह. सचिन व्हस्कोटी, पोना. अमोल म्हात्रे, पोशि. गोविंद तलवारे, मपोह. स्वाती पालवे, मपोह. स्वरा पाटील यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोसई. प्रतिक पोकळे हे करीत आहेत.




