कल्पेश ठाकूर जीवनदूत पुरस्काराने सन्मानित
रायगड जिल्हा प्रशासनाकडून जीवनदूतांच्या कार्याचा गौरव
राजमुद्रा न्यूज नेटवर्क, पेण
मुंबई गोवा महामार्गावर कुठेही अपघात झाला तर शासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वी पेणचे देवदूत कल्पेश ठाकूर तेथे पोहोचतात. आपला स्वतःचा व सहकाऱ्यांचा जीव धोक्यात घालून जखमींना बाहेर काढतात. वेळेत रुग्णालयात पोहचवतात. त्यामुळे जखमींना जीवनदान मिळतो. हेच खरे देवदूत आहेत. त्यांचे कौतूक दरवर्षी केलेच पाहिजे. हे लोक निःस्वार्थी पणे काम करत असतात. त्यांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार, असे आश्वासन राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी साई सहारा प्रतिष्ठान पेणचे संस्थापक कल्पेश शरद ठाकूर, समाजसेवक राजू पिचिका व जिल्ह्यातील अन्य मदतगारांना जीवनदूत पुरस्कार देऊन सन्मानित करताना दिले.
रायगड पोलीस दलातर्फे रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत जीवनदूत सन्मान सोहळा आर.सी.इफ.सभागृह, कुरूळ येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवन संरक्षण अधिकारी राहूल पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, तहसीलदार विक्रम पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. जीनवदूत म्हणून काम करणार्या जिल्ह्यातील संस्था व व्यक्तींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अपघात कमी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुंबई – गोवा माहामार्गावर मोठ्याप्रमाणावर अपघात होतात. या माहामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर आपघाताचे प्रमाण घटेल. हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मुंबई – गोवा रस्ता पूर्ण होईपर्यंत अपघाताची सर्व जबाबदारी सरकारची आहे असे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले म्हणाले. तर जीवनदूतांचा सत्कार स्तुत्य उपक्रम आहे. जीवनदूत हे खरे देवदूत आहेत. त्यांचा सन्मान केलाच पाहिजे. त्यांच्या कामाची दखल घेतलीच पाहिजे, असे आमदार महेंद्र दळवी म्हणाले.
जीवनदूत हे देवाच्या रूपाने आलेले दुत असतात. अडचणीत असलेल्यांना वाचवण्यासाठी ते येतात. त्यांचा जीव वाचवतात. वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळल्यास अपघात कमी होतील. अपघातग्रस्तांना मतद करणार्यांवर कोणतीही कारवाई करायची नाही असे सर्वोच्च न्यायालाने सांगितले आहे. ते लोकांपर्यन्त पाहचेल पाहिजे, असे जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले.
जनजागृती झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. अपघातात मृत्यूपाणार्यांची संख्या देखील कमी झाली आहे. असे असले तरी अपघात होता. नैसर्गिक आपत्ती येते. त्यावेळी जीवनदूत आपला जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवतात. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे पोलीस अधिकक्षक सोमनाथ घार्गे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. तर अप्पर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे यांनी आभार प्रदर्शन केले.

