ठळक बातम्या

पेण ग्रामीण आणि शहरी विभागात विजेचा लपंडाव सुरुच !

महावितरणाच्या निष्क्रियतेचा फटका पेण तालुक्यातील लहान उद्योगधंद्यांना.

अरविंद गुरव, पेण

पेण शहर आणि ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच असल्याने पेण परिसरातील नागरिक कमालीचे हैराण झाले असून, तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. त्याच प्रमाणे देखभाल दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद करूनही वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

पेण ग्रामीण विभागात तर वारंवार विजेचा खेळखंडोबा होत असलेला पाहायला मिळत आहे. विद्युत पुरवठा खंडित का झाला ? अशी विचारणा नागरिकांनी केल्यावर महावितरणच्या कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून नागरिकांना उत्तरच मिळत नाहीत. त्याचप्रमाणे महावितरणचे कर्मचारी एक तर फोन बंद करून बसतात किंवा संपर्क झाला तरी फोन उचलायची तसदी घेत नाहीत, अशी तक्रार नागरिक करीत आहेत. तर काही वेळा महावितरण मंडळाचे अधिकारी वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याचे खापर निसर्गावर फोडत असतात. 

पेण शहर व परिसरात विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार दररोजचे आहेत. गेल्या चार दिवसांपासून पेण शहर तसेच ग्रामीण भागातील आदिवासी वाड्यांवर दिवसाचे ३ ते ४ तास विद्युत पुरवठा खंडित असतो. 

कोणतेही कारण न देता पेण तालुक्यातील विविध भागात वीजप्रवाह खंडित करण्याचे प्रकार महावितरणकडून वारंवार होत आहेत. आठवड्यातुन मंगळवारी किंवा कधी कधी शुक्रवारी दिवसभर देखभाल दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात असतांना, इतर दिवशींही दिवस रात्र, सकाळ संध्याकाळ कधीही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने, नागरिकातून महाविरणच्या व्यवस्थापनाबाबत संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती बनविण्याचे कारखाने आहेत. तसेच अनेक लहान मोठे उद्योग धंदे ही आहेत. महावितरणाच्या आनागोंदी कारभारामुळे तसेच महावितरणाच्या निष्क्रियतेचा फटका या लहान मोठ्या उद्योगांना बसत आहे. 

पेण ग्रामीण विभागात प्रामुख्याने पेण पूर्व विभागात विविध कंपन्या देखील आहेत. नागरिकांची गावाखेड्यातील वीज खंडित झाली, तरी या कंपन्यांची वीज मात्र जशीच्या तशी असते. सर्वसामान्य नागरिकांची आबाळ करून विजेचा लोड, मोठ्या खाजगी कंपन्यांना  देण्यात येत असल्याने त्याचा परिणाम संपूर्ण तालुक्याच्या विजेवर होत आहे, असा नागरिकांचा महावितरणवर आरोप होत आहे. या संदर्भात विचारण करण्यासाठी पेण महावितरणचे अधिकारी सिद्धार्थ खोब्रागडे यांच्या सोबत भ्रमनध्वनी वरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!