२२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणी वेळी स्थानिकांनी नवीन प्रकल्पला विरोध करावा – संजय जाभळे, माजी जिल्हा परिषद सभापती
जेएसडब्ल्यू कंपनीमुळे स्थानिक नागरिकांना जीव घेणे आजार !
कंपनी प्रशासनाचे दुर्लक्ष आणि स्थानिकांवर मुजोरी.

प्रतिनिधी, पेण
१९९१ साली निप्पॉन डेंड्रॉ या नावाने स्थापन झालेल्या कंपनीचा विस्तार आज महाकाय असा जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये झालेला आहे. या कंपनीचा विस्तार करताना कंपनी प्रशासनाने स्थानिक रहिवाशांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या. स्थानिकांना नोकऱ्या भेटतील या आशेवर स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या जमिनी कंपनी प्रशासनाला दिल्या. मात्र कंपनी प्रशासनाने स्थानिकांना नोकर भरती प्रक्रियेमध्ये डावलले असल्याने स्थानिक बेरोजगार युवकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच ज्या थोडा-थोडक्या भूमिपुत्रांना कंपनीने नोकरीत सामावून घेतले आहे अशा स्थानिक युवकांना जाणीवपूर्वक कर्नाटक मधील बेल्लारी च्या प्लांटमध्ये पाठवून त्यांना हैराण करण्यात येते असे माजी जिल्हा परिषद सभापती संजय जांभळे यांनी वडखळ येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये कोक ओव्हन या प्रकल्पाचे विस्तारीकरण होणार आहे सध्या जो कोक ओव्हन प्रकल्प सुरू आहे त्या प्रकल्पामुळे प्रचंड प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे आणि या वायू प्रदूषणाचा विपरीत परिणाम येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये कॅन्सर सारख्या भयानक आजाराचे प्रमाण वाढत असून कॅन्सरमुळे येथील नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा संजय जांभळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
बेरोजगारी आणि येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या विपरीत दुष्परिणामांमुळे कंपनीमध्ये कोक ओव्हन या प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी कंपनीने २२ ऑगस्ट रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळ द्वारे आयोजित केलेल्या जनसुनावणीच्या वेळी स्थानिक नागरिक कंपनीच्या विस्तारीकरणाला विरोध दर्शवणार आहेत असे संजय जांभळे यांनी सांगितले. तसेच स्थानिकांनी कंपनी प्रशासनाच्या दबावतंत्राला बळी न पडता सर्व स्थानिकांनी या जनसुनावणीत सदर प्रकल्पला विरोध दर्शवावा असे आवाहन संजय जाभळे यांनी स्थानिकांना केले.

