कोकणातील घरे ही नुसती घरे नाहीत तर ती एक संस्कृती – अजित पितळे
गणपती सजावटीसाठी पुठ्ठ्यापसून बनवले हुबेहुब कोकणातील घर !

अरविंद गुरव, पेण
कोकणातील घरे ही नुसती घरे नाहीत तर ती एक संस्कृती आहे. परंपरा आहे आणि तीच जपण्याचा छोटासा प्रयत्न संतोष जाधव यांनी अंधेरी येथे आपल्या निवासस्थानी गणपतीच्या सजावटी मधून दाखवण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. असे गौरवोउद्गार कोकण कट्टा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अजित पितळे यांनी काढले.

कोकणातील कौलारू घर.. त्यासमोर शेणाने सारवलेले अंगण.. चारी बाजूनी झाडांचा कडेकोट बंदोबस्त… असा साधारण आरखडा प्रत्येक घराचा असतो याला कारण कोकणातील भौगोलिक स्थिती. खूप येणारा पाऊस आणि कमालीचे ऊन या दोघांना टक्कर देणारी ही घरे. हल्ली ही घरे नाहीशी होऊन त्याची जागा टुमदार बंगले आणि स्लॅबच्या जंगलांनी घेतली आहे. कोकणातील घरांची वैशिष्ट्ये म्हणजे अंगण त्यानंतर ओटी, त्याच्या पुढे माजघर आणि माजघरावर एक माडी. घरा समोर शेणाने सारवलेली जमीन. हे सर्व या सजावटी मध्ये फार सुंदर रित्या दाखवण्यात आले आहे. बघितल्यानंतर कोकणातल्या एका घरात जाऊन आल्यासारखे वाटते. सजावटीसाठी खऱ्या शेणाचा वापर करण्यात आला आहे. घरासमोरील तुळस आणि इतर असणाऱ्या वस्तू अगदी खऱ्या वाटतात आणि थेट कोकणात घेऊन जातात. घराला टेकून असलेली लाकडाची शिडी तर अत्यंत खरी दिसत आहे. समोरच्या खिडकीतून दिसणारे देवघर आणि त्यातील देव्हारा आणि त्यात ठेवलेले अस्सल घडीव देव लक्ष वेधून घेतात. घरात लावलेली छोटीशी सुप आणि लाकडी खिड़क्या अशा बारीक बारीक वस्तूंनी ही सजावट अजूनच खुलून येते. कोकणात प्रत्येक घरात खालू-बाजा असतोच. तो तर कोकणातील जगण्याचा आधार. प्रत्येक सणाला, लग्नाला हा बाजा वाजलाच पाहिजे आणि इतर वेळी तो घराच्या खुंटीला टांगून ठेवतात. हा टांगलेला बाजा सुध्दा या सजावटी मध्ये पाहायला मिळतो. घरा समोरील अंगणात अगदी सारवण करून त्यावरच बाप्पांची मूर्ती विराजमान केली आहे. घराच्या समोर आणि बाप्पाच्या पाटाभोवती काढलेली रांगोळी अगदी काळजाला भिडते. कोकणात माजघरात जाताना ओटीवर आपल्या मागच्या पिढीचे फोटो टांगलेले आढळतात पण या सजावटी मध्ये त्याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा फोटो लावून संतोष जाधव यांनी कळस गाठला आहे.

आपल्या अंधेरीच्या निवास स्थानी संतोष जाधव यांनी ही सुंदर कलाकृती केली आहे. या सजावटी साठी पर्यावरण पूरक गोष्टी वापरण्यात आल्या. घरातील टाकाऊ पुठ्ठा, पेपर, झाडाच्या सुकलेल्या फांद्या, चारा, शेण, रंग अश्या साध्या वस्तू पासून ही सजावट करण्यात आली आहे.

