श्रीस्वामी समर्थांचे मानसपुत्र श्री स्वामीसुत यांच्या समाधीची १५० वर्ष-पूर्ती !

संजय नारायण वेंगुर्लेकर, ठाणे-मुंबई
मुंबईचे हरिभाऊ दाजीसाहेब तावडे हे संसारी गृहस्थ व त्यांचेच पुढे ‘श्री स्वामीसुत’ नामे महासाधू बनणे हा एका मर्त्य अज्ञानी जीवाचा ज्ञानासक्त साधक बनण्याच्या परिवर्तनाचा प्रवास आहे, जो श्रीस्वामी समर्थगुरुंच्या केवळ ऐकाच स्पर्शाने क्षणार्धात झाला होता! हे अक्कलकोटस्थ परब्रह्म श्रीस्वामी समर्थ स्वरूपाचे अद्भूतरम्य सामर्थ्य होय.
जसा प्रत्येकजण आपल्या आयुष्यात प्रापंचिक यशासाठी देवाकडे मागणी करतो त्याच उद्देशाने अक्कलकोटात गेलेल्या हरिभाऊ तावडे या त्या अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाला समर्थांनी प्रथम भेटीतच व्यावहारीक जगण्यातील फोलपणा उलगडून दाखवला. या हरिभाऊ यांच्या घराण्याची पार्श्वभूमी गलबतवाल्या शूर मराठे सरदारांची. सन १६६०ला राजापूरजवळच्या आडिवरे येथे दसर्याच्या दिनी घातपाताने झालेल्या एका गनिमी हल्ल्यानंतर तावडे घराण्यातील तीन पराक्रमी वीर बंधू एकत्र न थांबता कोकण समुद्र किनाऱ्यावरील तीन ठिकाणी पोहोचले. इनामदार तावडे हे देवगड बंदराजवळ वाडा येथे उतरले. दुसरे गलबत जैतापूर बंदराला लागले ते तावडे विल्ये, राजापूरजवळ आले. तिसरे गलबत विजयदुर्गजवळ वाल्ये गावात स्थायिक झाले. यांपैकी विल्ये, राजापूर येथील प्रतापजी तावडे या वीर योद्ध्याच्या वंशातील हे हरिभाऊ.
हरिभाऊ बालपणीच मुंबईत आले. येथेच हिकमतीने शिक्षण करून पुढे सरकारी नोकरीत रुजू झाले. सुखदायी प्रपंच चालू असताना एकदा त्यांनी एका मित्रासह अफूच्या व्यवहारात सट्टा लावला. पण नंतर अफूचा भाव घसरला. हे वृत्त कानी येताच या नुकसानात आपली नोकरी जाईल या भीतीने त्या मित्रद्वयाने आपल्या आधीच कर्जात बुडालेल्या दुसर्या एका मित्राला सावकारासमोर आणून त्याच्याकरवी रक्कमेची हमी देवविली. त्यानेही मित्रप्रेमासाठी हमीपत्र लिहून दिले. त्याचवेळी त्या पंडित नामे मित्राला नेमके अक्कलकोटस्वामींचे लीलासामर्थ्य ऐकिवात आले होते. त्याने श्रीस्वामींकडे सात दिवसांत संकटमुक्त करण्याचा नवस केला. अन् खरोखरीच त्या कालावधीत अफूचा भाव चढल्याने त्या तिघांना प्रचंड नफा झाला. म्हणून नवस फेडण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी हे तिघे मित्र अक्कलकोटास गेले. या प्रथम भेटीतच श्रीस्वामीमहाराजांनी जीवनाचा खरा अर्थ हरीभाऊंना उलगडून दाखविला. त्यांना पारमार्थिक जीवन जगण्यासाठीची खात्री करवून दिली. प्रपंचासाठी झगडण्यामागचा फोलपणा दाखवून देत आज्ञा केली, ‘आपला संसार सर्व लुटवून टाक.’ हरिभाऊंच्या अंगावर छाटी व कफनी टाकून म्हणाले, ‘ही वस्त्रे परिधान कर. दर्याकिनारी ध्वजा लगाव. या घटनेनंतर नश्वर जगाच्या मायापाशात जगण्याऐवजी शाश्वत सौख्याचा परमार्थ मार्ग अनुभवण्यासाठी हरिभाऊ तत्काळ सिद्ध झाले. त्यांचे आत्मिक बळ जोखून श्रीस्वामी समर्थांनी त्यांना आपले आत्मलिंग स्व-रूप ‘चरणपादुका’ मुंबापुरी गादी स्थापन करण्यासाठी सुपूर्त केल्या. स्वस्थानी परतल्यावर हरिभाऊंनी आपल्या पत्नीची समजूत काढून स्वत:चे घर, दागदागिने सर्वांना वाटून टाकले. पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्रही राहू न देता तिला पांढरे वस्त्र नेसण्यास सांगितले व एकतारीवर भजने करण्याचा आग्रह धरला. केवळ अठरा वर्षे वयाच्या त्या तारका मातेला आरंभी हे सारे पचविणे अवघड होते. पण लवकरच त्याही उपासनेस लागल्या. हरिभाऊंनी जगाला जागे करण्यासाठी केलेले अफाट कार्य असे- १) श्रीस्वामींचा सुत म्हणवून घेत त्यांनी शेकडो अभंग रचना केल्या. २) श्रीस्वामीराजांना ‘श्रीस्वामी समर्थ’ हे नामाभिधान या श्री स्वामीसुतांनीच दिले. ३) श्रीस्वामीकृपेनंतर त्यांच्या ठायी बाणलेले वैराग्य व त्याचा खरा लाभ त्यांनी पत्नी व मुलीपर्यंत तसेच सार्या मुमुक्षू साधकांपर्यंत पोचविला. ४) श्रीस्वामींच्या कृपाप्रसादानंतर हरिभाऊंना आपला पूर्वजन्म आठवला. त्यामुळे त्यांनी श्रीस्वामी समर्थ गुरुंचे प्रकटीकरण शके १०७१, चैत्र शुद्ध द्वितीयेला झाले हे सर्वांसमोर मांडले. ५) महाराजांनी ‘मुंबापुरी दर्याकिनारी ध्वजा लावावी’, या केलेल्या आज्ञेनुसार हरिभाऊंनी आधी मुंबईला कामाठीपुऱ्यात मठ स्थापिला. नंतर जागा अपुरी पडू लागली म्हणून तो मठ कांदेवाडीत नेला. ६) श्रीस्वामी समर्थगुरुंनी मठाच्या पूजाअर्चेसाठी ब्रह्मानंद स्वामी कुमारांना पाठविले होते, त्यांच्या समवेत स्वामीसुतानी महाराष्ट्रभर श्रीस्वामी मठाच्या ध्वजा उभ्या केल्या. त्या कार्यातून केज-बीड, नगर, चिपळूण, सावर्डे, राजापूर, बेळगाव, ठाणे, वसई, कोल्हापूर येथे मठांची स्थापना झाली. त्याचप्रमाणे स्वामींचा सुत म्हणून त्यांनी एका नव्याच कार्याची आखणी केली. श्रीस्वामींच्या परंपरेला सांप्रदायाचे रूप दिले. दीक्षा पद्धतीची नियमावली बनवली. श्रीस्वामींचा भक्तिमार्ग चोखाळण्याचा भक्तांकडे आग्रह धरला. प्रापंचिकानी स्वामींना भजावे, जाणावे व त्याचबरोबर स्वत:च्या आत्मस्थितीचा विचार करून स्वकल्याण साधावे, असे ठासून सांगीतले. जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सर्वांनी श्रीस्वामी नामाची कास धरावी म्हणत ‘श्रीस्वामी समर्थ’ या षडाक्षरी नामजपाचे जगतारक महासूत्र सर्वांमुखी दिले. तसेच ‘श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ हा पंधरा अक्षरी नामगजर भजनांतून प्रचलित केला. त्यांचे हे विचार सर्वांवर ठसविण्यासाठी शेकडो अभंग रचिले. श्रीस्वामी अवतारकांड लिहून श्रीस्वामी हे नेमके कोण आहेत? कोठून आले? या प्रश्नांवरचा पडदा बाजूला केला.

श्रीस्वामीरायांनीही या आपल्या मानसपुत्रावर कृपेचा वर्षाव केला. स्वामींनी मान्यता दिल्यावर स्वामी-सुतांनी महाराजांचा ‘प्रकटदिन उत्सव’ सुरू केला. श्रीस्वामीरामप्रभूंचे ते प्रिय भक्त ‘हनुमंत’ म्हणून श्रीस्वामीभक्तांनी स्वामीसुतांचा जयजयकार केला. श्रीस्वामीमहाराजांनी स्वतः अक्कलकोटात समाधिस्थ होण्याचे सूतोवाच सुतांपाशी करताच व्यथित झालेल्या स्वामीसुतांनी; अक्कलकोटात येऊन श्रीस्वामींची गादी सांभाळण्याऐवजी, आपल्या देहाचाच त्याग करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या उण्यापुर्या पस्तिशीतच सन १८७४च्या श्रावण वद्य प्रतिपदेला मुंबापुरीमध्ये गिरगावच्या कांदेवाडी मठात आपला देह त्यागला. यंदा त्या घटनेला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. कांदेवाडीच्या याच मठातील श्री स्वामीसुतांकडील आत्मलिंग पादुका, त्यांच्या अन्य सार्या प्रासादीक वस्तू व मुंबापुरी गादीकडील श्रीस्वामीपादुका श्रीस्वामी समर्थ आज्ञेनुसार सन १९०७ला सिद्धाबाईंनी इतरत्र नेल्या. पुढे चेंबूर येथे मठस्थापना केली. श्री स्वामीसुतांच्या या श्रीगुरुसमर्पित चित्तवेधक जीवनगाथेचे ‘५५ बिल्वदल’ चरित्र वर्णन, स्वामीसुत लिखित तीनशेहून अधिक अभंग, श्रीस्वामीपाठ, दास, गृहस्थ व यतिदीक्षेचे अभंग, अवतारकांड आदी रचना बर्याच वर्षांच्या संशोधनातून एकत्रित करण्यात आल्या व त्यांच्यावरील ‘श्रीस्वामी समर्थांचे मानसपुत्र – श्री स्वामीसुत यांचे जीवन-चरित्र’ संजना पब्लिकेशन, मुंबईतर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.
सदरहू ग्रंथात श्रीस्वामी व त्यांच्या या प्रिय सुतांबाबतच्या अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे आहेत. तसेच त्यांच्या जीवनकार्याचे यथासांग दर्शन, अनेक दूर्मीळ फोटोंच्या द्वारे घडत आहे. या ग्रंथाबाबतचे समग्र संशोधन व लेखन प्रस्तुत लेखकानेच केलेले असून, हा ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध आहे. श्री स्वामीसुतांनी आरंभिलेले कार्य हे पुढे त्यांचे कनिष्ठ बंधू सच्चिदानंद स्वामीकुमार व त्यांच्या पश्चात श्री स्वामीसुतांची कन्या सिद्धाबाई यांनी वर्धिष्णू केले. सिद्धाबाईंनी स्थापिलेला मठ सध्या चेंबूर नाक्याजवळ, जैन मंदिराच्या बाजूला, मुंबई येथे असून स्वामींनी दिलेल्या आत्मलिंग पादुका व अन्य चार श्रीस्वामी पादुकांचे, तसेच श्री स्वामीसुत महाराजांची वीणा, भिक्षापात्र, छोटी छडी, श्रींची रूद्राक्ष माळ आदी अस्सल पवित्र वस्तूंचे या चेंबूर मठातच दर्शन घेता येते. आता स्वामीसुतांच्या १५०व्या समाधी वर्षपूर्तीनिमित्ते या मठातर्फे चेंबूर येथे दि. १८ ते २० आॅगस्टला तीन दिवसांच्या महोत्सवाची आखणी करण्यात आलेली आहे. श्री स्वामीसुत यांच्या मुंबापुरी गादी संबंधातील महाराष्ट्रातील मठसंस्थापकांच्या वंशजांना दि. १८ला सकाळी दहा वाजता चेंबूर मठात आमंत्रित केले आहे. तर दि. १९ला श्री स्वामीसुतांच्या कार्याची महती सायंकाळी भक्तांसमोर परिसंवादावाटे ठेवण्यात येईल. तिनही दिवशी दिवसभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन चेंबूर मठ येथे करण्यात येणार आहे. असे हे श्रीस्वामीकार्य सर्वदूर नेणारे श्री स्वामीसुत महाराजांना जाणण्यासाठी, तसेच त्यांचे कार्य अवलोकून आपण सर्वांनीच समर्पित देव-भक्त बनण्यासाठी श्रीस्वामी समर्थांच्या या अद्भूत मानसपुत्राचे चरित्र आवर्जून अवलोकिले पाहिजे. अध्यात्मदृष्ट्या स्वकल्याण साधण्यासाठी या ग्रंथाचे वाचन प्रत्येक साधकाला उपयुक्त ठरेल इतके महत्वाचे आहे.

