ईद ए मिलाद उत्साहात साजरा !
पेण शहरात विविध कार्यक्रम शहरातील जुलूसमध्ये एकात्मतेचे मनोमिलन.
प्रतिनिधि, पेण
इस्लामचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस संपूर्ण जगात ईद मिलाद म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा ईद ए मिलाद अनंत चतुर्दशीच्या एक दिवस मागे पुढे आल्याने रायगडमध्ये १६ तारखेलाच ईद ए मिलादची सुट्टी प्रशासनच्या वतीने जाहीर करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पेणमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने सोमवार १६ सप्टेंबरला जुलूस काढण्यात आला होता.
ईद ए मिलाद निमित्त खान मोहल्ला येथे रविवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी लहान मुलांचे नातं पठण, प्रवचन, कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच कसाई मोहल्ला येथे १६ सप्टेंबर रोजी मुलांच्या नातं पठण कार्यक्रम झाले यावेळी दोन्ही मुस्लिम मोहल्ल्यात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते. सोमवारी १६ सप्टेंबर रोजी मौलाना हैदरअली यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये मौलाना अन्सार हजरत, हाफीजी अताऊल रहमान, मौलाना मन्सूर, मौलाना सलाउद्दीन, मौलाना फुरकान, मौलाना जबीर आदींसह खान मोहल्ला, कसाई मोहल्ला, वडगाव, अंतोरे, वडखळ तसेच तालुक्यातून मुस्लिम बांधव, शांतता कमिटी सदस्य मोठ्या संख्येने सामील झाले होते. यावेळी जुलूस खान मोहल्ला येथून निघून आझाद मोहल्ला, महावीर मार्ग, कसाई मोहल्ला येथून बाजारपेठ मार्गे पुन्हा खान मोहल्ल्यात येऊन जुलुसची सांगता करण्यात आली.

यावेळी कुराणातील घोषणा देत, चाँद – तारा असलेले झेंडे घेऊन तसेच तिरंगा फडकावून लहान मुलांपासून ते वृद्धांच्या घोषणांनी परिसर दुमदुमले. यावेळी कसाई मोहल्ला, आझाद मोहल्ला येथे मिरवणुकीतील लोकांना सरबत व प्रसादाचे वाटप करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, पोलीस निरीक्षक संदीप बागुल तसेच शांतता कमिटी सदस्य यांचेही स्वागत करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे व शांतात कमिटी सदस्य यांनी मुस्लिम समाजाला ईद ए मिलाद निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी फैय्याज इनामदार व भाऊ मुजावर यांनी ३ दिवस कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्ल्याबद्दल उपस्थित समाज बांधवांचे व पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मांडले. शेवटी मौलाना हैदरअली यांच्या कुराणातील आयात पठणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

