मिरवणुकांमधील आवाजावर आता पोलिसांची नजर !
मिरवणूक मार्गांवर ठीकठिकाणी साऊंड मीटर तैनात.
प्रतिनिधि, पेण
नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या मिरवणुका या उत्साहात आणि शांततेत पार पडल्या. आता उद्या होत असलेल्या अनंत चतुर्दशीच्या गणपतींचे विसर्जन मिरावणुकांमध्ये कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेण पोलिस प्रशासन सतर्क झाले असुन अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत वाजविली जाणारी वाद्ये आणि डीजे सिस्टीमच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या ध्वनी क्षेपणाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पेण पोलिसांतर्फे पेण शहारातील महत्त्वाच्या मिरवणूक मार्गातील पाच ते सहा ठिकाणी साऊंड लेव्हल मीटर तैनात करण्यात येणार आहेत.
साऊंड मिटरच्या वापराचे प्रात्यक्षीक पंचनामा आज डीवायएसपी शिवाजी फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या उपस्थितीत करण्यात आला. शहरातील हुतात्मा कोतवाल चौक, शिवजी चौक, आंबा माता मंदीर, नंदिमाळ नाका, भोगावती नदीवरील विसर्जन घाट यांसह काही महत्त्वाच्या ठिकाणी ही रेग्युलर साऊंड लेव्हल तपासून तशा प्रकारच्या प्रात्यक्षिकाद्वारे पंचनामे करण्यात आले. ध्वनि प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर आणि डीजे मालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी सांगितले. पेण मधील नागरिकांना आवाजाचा त्रास होणार नाही अशा प्रकारे वाद्य वाजऊन आनंदी वातावरणात शिस्तबध्द पद्धतीने गणेशोत्सव मिरवणूक पार पाडावी आणि पोलिस प्रशासनाला गणेशभक्तांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी केले आहे.




