सामाजिक

स्मृतिभंश असलेल्या वृद्ध इसमास वाहतूक पोलिसांनी दिले नातेवाइकांच्या ताब्यात !


संजय कदम, पनवेल

स्मृतीभंश असलेल्या वृद्ध इसमास वाहतूक पोलिसांनी अधिक चौकशी करून त्याच्या नातेवाईकांचा सुखरुपपणे ताब्यात दिले.
महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे पोलीस उपनिरीक्षक देविदास नाईक यांच्यासह पळस्पे मोबाईल वरील अंमलदार ठाकूर, भगत, कर्डिले असे  मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर रात्र गस्त करीत असताना रात्री ००.३० वाजेच्या सुमारास डेल्टा फोर्स कर्मचारी यांनी कळविले की, मुंबई पुणे एक्सप्रेस वे पुणे लेन किमी ४:०० देवद गाव, ता.पनवेल येथे एक ७० वर्षीय वृद्ध व्यक्ती शोल्डर लेनवर झोपलेले आहे. सदर ठिकाणी तात्काळ पोहचून  त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांना घरचा पत्ता आठवत न्हवता. तसेच त्यांचे नाव अगर इतर कोणतिही माहिती सांगु शकत नव्हते.

सदर वयोवृद्ध इसमाकडे एक बंद असलेला जुना मोबाईल मिळून आला. सदरचा मोबाईल चालु केला व त्यांचा मुलगा विनोद बिळवार यांचेंशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, त्यांचे वडील दि. २२ ऑगस्ट रोजी दुपारी ०३ वाजले पासून गोवंडी येथील राहते घरातून कोणासही काहीएक न सांगता निघून गेले  होते. त्यांना मधुमेह व स्मृतिभंशाचा (अलमायझर) आजार असल्यामुळे ते अशाप्रकारे वागत होते. त्यांच्याशी फोनवर संपर्क करत होतो परंतु ते सतत असंबंध बडबड करत होते तसेच ते कुठे आहेत हे ही सांगू शकत नव्हते. त्यामुळे त्यांचा दिवसभर आम्ही शोध घेतला असता ते मिळून आले नव्हते. त्या अनुषंगाने त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे मुंबई शहर येथे वडील हरवल्या बाबत कळविले आहे. सदर वृद्ध इसमाचा मोठा मुलगा अशोक सिद्धाप्पा बिळवार व विनोद सिद्धाप्पा बिळवार यांना कार्यालयात बोलावुन सुखरूपरित्या त्यांचे ताब्यात देण्यात आले आहे. वृद्ध इसमाच्या दोन्ही मुलांनी महामार्ग पोलीसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!