पेणमध्ये भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
प्रांताधिकारी प्रवीण पवार त्यांच्या हस्ते ध्वजारोहण

राजमुद्रा न्यूज नेटवर्क, पेण
भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन पेण मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील विविध शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज पहाटेपासूनच सगळीकडे आनंदी वातावरण होते. पेण तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, पोलीस ठाणे, नगरपरिषद, महात्मा गांधी वाचनालय, रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांसह, प्रायव्हेट हायस्कूल, सार्वजनिक हायस्कूल, कारमेल हायस्कूल, न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल, आय.डे.केअर गतीमंद मुलांची शाळा, शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यालय अशा अनेक ठिकाणी आज ध्वजवंदन करण्यात आले. अंतोरे येथील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर केले. वंदे मातरम्, भारत माता की जय, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो अशा घोषणा देत तेथील परिसर दणाणून सोडला राष्ट्रीय सणाचा हा उत्सव पाहता विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीते गायली यावर्षी पहिल्यांदाच तहसील कार्यालया ऐवजी प्रांत कार्यालय येथे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी आमदार रवीशेठ पाटील, तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, पोलीस निरीक्षक संदीप बागुल, पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, पोलीस निरीक्षक नागेश कदम आदींसह असंख्य नागरिक उपस्थित होते. यावेळी शिवकालीन खेळांचे सादरीकरण करण्यात आले.
