१४ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून फरार झालेला पोलीस पाटील अखेर अटकेत.
प्रतिनिधि, पेण
पेण तालुक्यातील डोलवी येथील पोलीस पाटील रमेश पाटील या ६२ वर्षीय वयोवृद्धाने एका १४ वर्षीय बालिकेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना चार ऑक्टोंबर रोजी घडली होती. सदर आरोपीवर वडखळ पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र यातील आरोपी हा फरार झाल्याने वडखळ पोलिसांकडून आरोपी रमेश पाटील याचा शोध सुरू होता. अखेर आज पोलिसांनी आरोपी याच्या मुस्क्या आवळून त्यास अटक केली आहे.
डोलवी येथील पोलीस पाटील रमेश अबांजी पाटील यांनी आपल्याच मित्राच्या ओळखीचा गैरफायदा घेत त्याच्या १४ वर्षीय पिडीत मुलीबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार लैगिक अत्याचार केल्या प्रकरणी त्याच्यावर वडखळ पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सदर आरोपी फरार असल्याने वडिलांना सहकार्य केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या मुलास अटक करून त्याची अलिबाग येथील न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. अखेर वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी योग्य तपास करत आज दुपारी आरोपी रमेश पाटील यास अटक केली आहे.

