क्राईम

नवी मुंबईच्या इस्टेट एजंट सुमित जैनचा मृतदेह पेण-गागोदे येथे सापडला

दूसरा एजंट अमीर खानजादा अजूनही बेपत्ता   

प्रतिनिधि, पेण

आपल्या खाजगी मिटींगसाठी रायगडात आलेले नवी मुंबईतील दोन रिअल इस्टेट एजंट अचानक बेपत्ता झाले होते. त्यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याने गाडीमध्ये रक्ताचे डाग आणि दोन बंदुकीच्या गोळ्यादेखील सापडल्या होत्या. मात्र (२३ ऑगस्ट) शुक्रवारी पेण-खोपोली रोड वरील गागोदे गावाच्या हद्दीत आतमधील रस्त्यावर सुमित जैन या एकाच एजंट चा मृतदेह आढळून आला. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. परंतु दुसरा एजंट अजूनही बेपत्ता असल्याने त्या एजंटचे नेमके काय झाले आहे? याबाबतही संशय निर्माण झाला आहे.

नवी मुंबईतील नेरुळ येथे राहणारे सुमित जैन व अमीर खानजादा हे दोघे रिअल इस्टेटचे काम करतात. बुधवारी (२१ ऑगस्ट) रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अमिर हा सुमित जैन यांच्याकडे गेला होता. आपल्याला मिटींगला जायचे आहे, असे सांगून, दोघेही बलेनो कार घेऊन रायगड जिल्ह्यात निघाले. रात्री उशिर झाल्यामुळे घरच्यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांचेही मोबाईल बंद असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे कुटुंबियांची चिंता वाढली होती. त्यांनी नेरुळ पोलीस ठाणे गाठत मिसिंग तक्रार दाखल केली होती. त्यांच्या बलेनो कारला जीपीएस सुविधा असल्याने जीपीएसवरून कारचा मागोवा घेत ते मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन पाली फाटा एक्झिटच्या बाजूला, कॅफे सागर हॉटेलकडे जाणाऱ्या मार्गावर आले असता त्यांना तिथे त्यांची गोळीबार झालेली कार सापडली होती. ते दोघेही गायब होते.मात्र आज २३ ऑगस्ट रोजी यातील एजंट सुमित जैन यांचा मृतदेह पेण-खोपोली रोडवरील गागोदे गावाच्या हद्दीत रस्त्यावर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. परंतु दुसरे एजंट समीर खानजादा यांचा तपास रात्री उशिरापर्यंत लागला नाही.

घटनास्थळी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल व नवी मुंबई येथील पोलीस अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!