रोटरी क्लब ऑफ पनवेल इलाईट तर्फे ई-लर्निंग किटचे वाटप !
प्रतिनिधि, पेण
आर्थिक दृष्ट्या सबल नसलेल्या समाजातील मुलांना डिजिटल युगाची सवय आणि माहिती व्हावी या दृष्टिकोनातून रोटरी क्लब ऑफ पनवेल इलाईट या पनवेलच्या रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन सुनीती दीक्षित आणि क्लबचे सर्व सभासद यांच्या तर्फे पेण तालुक्यातील तरणखोप, दादर आणि खालापूर तालुक्यातील ठाणेन्हावे आणि वावोशी या पटसंख्या जास्त असलेल्या जिल्हा परिषद शाळांना तसेच पेण येथील आई डे केअर या मतिमंद आणि गतिमंद मुलांच्या शाळेसाठी ई लर्निंग किट देण्यात आले. ज्या माध्यमातून पहिले ते दहावीपर्यंतच्या मराठी आणि सेमी इंग्लिश वर्गातील मुलांना संपूर्ण अभ्यासक्रम डिजिटली म्हणजे टीव्हीच्या माध्यमातून शिक्षकांच्या मदतीशिवाय करता येईल. अशा प्रकारचे संच या शाळांना देण्याप्रसंगी उदघाटन करताना क्लबच्या अध्यक्षा सुनिती दीक्षित यांनी या सेवेचा विद्यार्थी आणि शिक्षकांनी पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपले संगणकीय ज्ञान वृद्धिंगत करावे असे सांगितले.
या प्रसंगी शाळांच्या शिक्षक आणि विद्यार्थी वृंदाने रोटरी संस्थेचे खूप आभार मानले तसेच मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख निश्चितपणे उंचावत नेऊ असे आश्वस्त केले. यापूर्वी देखील या संस्थेने पेण तालुक्यातील पाच प्राथमिक शाळांना अशा प्रकारचे ई लर्निंग संच दिलेले आहेत आणि त्याचा फायदा असा आहे की मुलांची गुणवत्ता १५ ते २० टक्क्यांनी सुधारून त्यांच्या प्रगतीमध्ये लक्षणीय फरक पडलेला आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी पेण येथील समाजसेवक सुरेंद्र व सरिता व्यवहारे या दाम्पत्याच्या अथक सहकार्यातून हा उपक्रम यशस्वी झाला.

