भरधाव डंपरची एसटी बसला धडक ! चौघांचा मृत्यू.
रायगड राजमुद्रा न्यूज नेटवर्क
तळा-मांदाड रस्त्यावर एसटी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून. २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातातील जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे.
तळा तालुक्यातील तारणे येथील एका धोकादायक वळणावर हा भीषण अपघात झाला आहे. रहाटाड येथून तळा येथे येणारी एसटी बस आणि आगरदंडा दिशेने जाणाऱ्या डंपरमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तृप्ती खुटीकर, लक्ष्मण ढेबे, अनन्या गवाणे व विठ्ठल कजबजे या चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये एका सात वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. या अपघातात जवळपास वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने तळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताला डंपर चालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. एसटी चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे अपघाताची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली, असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिकांचे सांगणे असून, प्रशासनाने या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

