पेण तालुक्यातील गणपती कारखानदार विद्युत महामंडळाच्या विरोधात आक्रमक !
सतत खंडीत होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन छेडणार
प्रतिनिधी, पेण
पेण तालुका श्रीगणेश मुर्तीसाठी जगभर प्रसिध्द आहे. पेण तालुक्यातील घराघरात गणपती मूर्ती बनविण्याचे कारखाने आहेत. यंदा २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. त्यादृष्टीने जुलै व ऑगस्ट ह्या महिन्यांतच रात्रंदिवस काम करून श्रीगणेशमुर्ती वेळेत पूर्ण कराव्या लागतात. आणि यासाठी पेणमधील सर्व कारखानदार आणि मूर्तिकार अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र हे सर्व काम विजेवर अवलंबून आहे. परंतु काही दिवसांपासून पेण तालुक्यामध्ये सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे गणेश मूर्ती वेळेत पूर्ण करणे कामी कारखानदारांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. सतत खंडीत होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे गणपती मूर्तीच्या घेतलेल्या ऑडर्स वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सर्व गणेश मूर्ती कारखानदारांसमोर उभे ठाकले आहे. तसेच सर्व कारखानदारांनी बँकांमधून प्रचंड प्रमाणात कर्ज घेतली आहेत. श्रीगणेशमूर्ती वेळेत पूर्ण न झाल्यास कारखानदारांचे प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आज पेण मधील कारखादारांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन, विज पुरवठा सुरळीत करणेसाठी विनंती केली आहे.
जर विज पुरवठा सुरळीत झाला नाहीतर पेण तालुक्यातील सर्व कारखानदार मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे गणेश मूर्तिकार संघटने तर्फे श्रीकांत देवधर यांनी महावितरण शहर अभियंता मेश्राम यांना सांगितले. यावेळी श्रीकांत देवधर, मयुर सावळे, मयुरेश चाचड, कपिल सुतार, निलेश समेळ, मिलिंद पैठणकर, गणेश पवार, सागर पवार व इतर गणपती कारखानदार उपस्थित होते.
आम्हा गणेशमूर्ती कारखानदारांवर कामाचा ताण जास्त असल्याने आम्हाला सध्या पेण येथील महावितरणाच्या कार्यालयात तक्रार करण्यासाठी सुध्दा वेळ मिळत नाही. मात्र घराघरात सतत खंडीत होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे विद्युत महामंडळावरील रोष खुपच वाढला आहे. महावितरण कार्यालयाने त्वरित पेण मधील विज पुरवठा विनाखंडित सुरु ठेवावा अन्यथा पुढील दिवसात गणपती कारखानदारांच्या रोशला सामोरे जावे लागेल – श्रीकांत देवधर, मूर्तिकार – पेण




