परप्रांतिय व्यापाऱ्याच्या अनधिकृत भंगार गोडाऊनवर पोलिसांचा छापा !
जेएसडब्ल्यू कंपनीचा १० लाखांचा स्टील बार जप्त.
अरविंद गुरव, पेण
पेणमध्ये अनधिकृत भंगार वाल्यांचा सुळसुळाट जोरात सुरु आहे. परप्रांतीय भंगार व्यापारी पेणमध्ये मोकळी जागा मिळेल तेथे आपले बस्तान टाकत आहेत. हेच भंगार व्यापारी चोराटी भंगार खरेदी विक्री चा व्यवसाय करीत असतात.
मुंबई- गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील जिते गावाजवळ असणाऱ्या आकाशदीप हॉटेलच्या पाठीमागे परप्रांतीयांनी अनाधिकृतपणे भंगारच्या अड्डा उभारला असून या ठिकाणी कंपन्यांचा येणार माल चोरीद्वारे घेतला जात असल्याची माहिती दादर सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांना मिळताच त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकून जेएसडब्ल्यू कंपनीचा १० लाखांचा स्टील बार जप्त केला असून आरोपीस अटक केली आहे.
रायगड जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनाधिकृतपणे भंगारवाल्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले असून त्यातच जेएसडब्ल्यू कंपनी डोलवी येथून टीएमटी स्टील बार माल विविध कंपन्याना सप्लाय करण्यासाठी ज्योती स्ट्रान्सपोर्ट मधील ट्रेलर एमएच ४६ बीएम ६५८९ वरील चालक व ईतर काही ट्रेलर चालकांनी सदरचा पूर्ण माल विविध कंपन्यांना न पुरविता अंदाजे १५ ते २० टन मालाचा अपहार करुन तो जिते येथील आकाशदीप हॉटेलच्या पाठीमागे मोकळ्या जागी अनाधिकृतपणे उभारलेल्या भंगारवाल्यांकडे उतरविले असल्याची माहिती फिर्यादी कंपनीचे जनरल मॅनेजर पंकज कुमार अग्रवाल यांनी दादर सागरी पोलीस स्टेशनला दिली. या माहितीच्या आधारे दिनांक १६ ते २० डिसेंबर या दरम्यान तपास करत दादर सागरी पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राह्मणे यांनी आपल्या पथकासह सदर भंगारवाल्यांकडे धाड टाकली असता त्याठिकाणी जेएसडब्ल्यू कंपनीचे १५ ते २० टन वजनाचे असून सुमारे १० लाख रुपयांचे स्टील बार जप्त केले. या कारवाईमध्ये एका आरोपीस अटक केली असून मुख्य आरोपी नसीम हा फरार आहे. सदर कारवाईमुळे मुंबई – गोवा महामार्गावरील अनधिकृतपणे उभारलेल्या भंगारवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.



