साईबाबांच्या भव्यदिव्य पालखी सोहळ्याचे आयोजन !
ओम साई पदयात्रा मित्र मंडळाचे सलग १६ वर्षे नियोजन.
प्रतिनिधि, पेण
श्री साई बाबांची मानाची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओम साई पदयात्रा मित्र मंडळ पेण तर्फे भव्यदिव्य पालखी परिक्रमेचे पेण शहरात आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण पेण शहर साईमय होणार आहे. कासार तलाव येथील साई मंदिर येथून सायंकाळी पाच वाजता विद्युत रोषणाई, ब्रॉसबँड पथकाच्या सुंदर संगीताच्या तालावर पालखीला प्रारंभ होणार आहे. या सोहळ्यामध्ये चलचित्र रथ शामिल होणार आहेत. यामध्ये द्वारकामाई मंदिर, बैलगाडी हाकताना साईबाबा, साईंबाबांचा जिवंत चलचित्र देखावा यांचा विशेष समावेश असतो.
कासार तलाव येथील साई मंदिरा पासून सुरू होणारी मिरवणूक तेरा घरांची आळी, चावडी नाका, आंबेडकर चौक, नगरपालिका चौक, राजू पोटे मार्ग, कोळीवाडा, महाविर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कासार आळी, हनुमान आळी आणि पुन्हा साई मंदिर येथे पदक्रांत होणार आहे. पालखी मार्गावर सर्वत्र भगवे पताके, भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. घरासमोर पालखी आल्यानंतर प्रत्येक महिला आरती ओवाळून साईंबाबांचे औक्षण करत असते. शेवटी साईबाबांच्या महाआरतीने व महाप्रसादाने पालखीची सांगता होणार आहे.
त्यानंतर शुक्रवारी सकाळी ६ वाजता साईबाबांची पालखी पायी चालत शिर्डीकडे मार्गस्थ होणार आहे. गेली १६ वर्षे ओम साई पदयात्रा मित्र मंडळ हे पेण ते शिर्डी पर्यंत साई पालखीची सेवा करत आहेत. सदर मिरवणूक पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी ओम साई पदयात्रा मित्र मंडळाचे सर्वेसर्वा कल्पेश ठाकूर, मितेश भानुशाली व त्यांचे शेकडो सहकारी साई सेवक गेली महिनाभर दिवस रात्र मेहनत घेत आहेत. पेणकर वर्षभर या श्री साई बाबांच्या भव्यदिव्य मिरवणुकीची वाट पाहत असतात.


