मविआच्या प्रमुख नेत्यांनीच पेण विधानसभेची जागा शेकापला सोडली आहे – अतुल म्हात्रे
ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती
प्रतिनिधि, पेण
पेण, अलिबाग आणि पनवेल विधानसभा मतदार संघ हे शेकापच्या उमेदवारांसाठी सोडले असल्याचे जाहीर वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी सोमवारी दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेऊन केले होते. त्यामुळे पेण विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचा मीच अधिकृत उमेदवार आहे असा दावा पेण येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेकापचे उमेदवार अतुल म्हात्रे यांनी केला.
कालपर्यंत भाजपचे विधानसभा प्रमुख म्हणून पद मिरवणाऱ्या उमेदवाराने नंतर अपक्ष असल्याची घोषणा केली व अचानक महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. “ते उमेदवार महाविकास आघाडीचे नसून ही भाजपची बी टीम आहे” असा आरोप यावेळी अतुल म्हात्रे यांनी केला. थोडक्यात ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे असे अतुल म्हात्रे यांनी सांगितले.
गेल्या १० वर्षांपासून १९१ पेण सुधागड रोहा मतदार संघाचे विद्यमान नेतृत्व हे निष्क्रिय असल्याने जनतेमध्ये त्यांच्या विरोधात नाराजी आहे. पेण मतदार संघाचा विकास करण्यात ते अपयशी ठरले आहेत. आजही या मतदार संघात रोजगार, बँक घोटाळा, पाणी, रस्ते असे अनेक प्रश्न आहेत. मुंबई गोवा महामार्ग मागील १६ वर्षात बनला नाही. पेण खारेपाट विभागातील पाण्याचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. गडब विभागात होऊ घातलेली एमआयडीसी व त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट तसेच एमएमआरडीए अंतर्गत येणारे विविध प्रकल्प व त्यामुळे येथील शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता एक सक्षम व दूरदृष्टी असणारा आमदार पेणला आवश्यक आहे. व त्यामुळे मला या आमदारकीच्या निवडणूकीत येथील जनता निश्चित निवडून देईल असा विश्वास पेण येथील पत्रकार परिषदेत उमेदवार अतुल म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते महादेव दिवेकर, ऍड.रोशन पाटील, तुकाराम खांडेकर, नंदकुमार म्हात्रे, वडखळचे माजी उपसरपंच निलेश म्हात्रे, प्रल्हाद पाटील यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे अनेक जेष्ठ नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.




