आगामी निवडणुकीसाठी महायुतीतच जोरदार रस्सीखेच; इच्छुकांना आर्थिक बाजूची तयारीही करावी लागणार
अरविंद गुरव, पेण
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगुल वाजला असून जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपालिका निवडणुका २ डिसेंबर रोजी जाहीर झाल्या आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून महायुतीतीच जोरदार रस्सीखेच पहायला मिळत आहे. येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप या प्रमुख पक्षांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. दरम्यान आता येथे उमेदवारीसाठी आर्थिक निकष राजकीय पक्षांकडून लावली जाईल जाण्याची शक्यता आहे. यामुळे येणारी स्थानिकची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर नाही तर आर्थिक निकषांवर जाणार अशी चर्चा येथे रंगली आहे.
येथे राजकीय पक्षांकडून इच्छुकांचा शोध घेताना कार्यकर्त्याच्या बैठकीतच नेत्यांकडून आर्थिक बाजूचं काय, तयारी आहे का? अशी विचरणा होत आहे. तसेच उमेदवार हा स्वत: सक्षम असेल तरच उमेदवारी दिली जाईल असा फतवा प्रमुख राजकीय पक्षांनी काढला असल्याची जोरदार चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांकडून आर्थिक जुळवाजुळव करण्याची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान पेण तालुक्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले असून येत्या काही महिन्यात येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही होणार आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार गट) तसेच भाजपकडून आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. तसेच मनसे व शिंदे सेनेनेही बैठकीचा सिलसिला सुरु केला आहे.
या बैठकांमध्ये इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांशी चर्चा करताना फक्त पक्षाकडून येणाऱ्या आर्थिक फंडावर अवलंबून न राहता स्वत:च्या आर्थिक बाजूची तयारी करावी अशा सूचना दिल्या जात आहेत. यामुळे काम करणारे कार्यकर्ते आगामी निवडणुकीच्या मैदानापासून दूर राहणार तर नेत्याच्या जीवावर निवडणूक लढविणारे इच्छुक उमेदवारांची ही आता अडचण होणार आहे. तसेच जे धनिक आहेत अशांनाच आता उमेदवारीचे रेड कार्पेट मिळणार यात शंका राहणार नाही.
सध्या रायगडमध्ये उसळलेल्या वादामुळे येथे भाजपला फायदा होणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत उसळलेल्या वादामुळे येथे राष्ट्रवादी-ठाकरेंची शिवसेना अशी युती झाली आहे. तर एकमेकांचा काटा काढण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना कंबर कसून तयारी करताना दिसत आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जाणारे अनेक इच्छुकांनी आपला मार्ग बदलत भाजपकडे वळवला आहे. यामुळे आगामी स्थानिकसाठी भाजपला कार्यकर्ते मिळणारच आहेत. सोबत एखादा दुसरा चांगला चेहराही मिळणार आहे. मात्र मात्र उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची दमछाक होणार आहे.

