पेणमध्ये शिवजयंती मोठया उत्साहात साजरी !
शिवजयंतीला देखील सरकार ने ड्राय डे घोषित करावा – हरिष बेकावडे
प्रतिनिधि, पेण
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराजांच्या पुतळ्याला पेण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या शुभहस्ते तसेच आमदार रविंद्र पाटील आणि माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून उत्सव मोठ्या थाटामाठाट साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आमदार रवीशेठ पाटील,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जीवन पाटील, पोलीस निरीक्षक संदीप बागुल, माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील, सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे, हितेश पाटील, मितेश शहा, किरण शहा, दयानंद गावंड, महेश वडके, शिवाजी चव्हाण, सुहास कांबळे, रमेश देशमुख, उमंग कदम, विश्वनाथ गायकवाड, प्रवीण बैकर आणि पेण नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित तमाम शिवसैनिकांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रवीर संघ युद्धकला प्रशिक्षण संस्कृती संवर्धनच्या विद्यार्थी दिव्यांका उदेकर व वेद वास्कर यांनी शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. आज पेण मध्ये शहर तसेच ग्रामीण भागात शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्याला शिवजयंती निमित्त शिवप्रेमींकडून अभिवादन तसेच शिवज्योत दाखवून मनाचा मुजरा करण्यात आला. या दिनी विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज संपूर्ण पेण तालुका भगवामय होऊन शिव गर्जनांनी निनादुन गेला होता.
राष्ट्रपिता महात्मागांधी यांच्या जयंती तसेच पुण्यतिथीच्या दिवशी व इतर महत्वाच्या दिवशी शासनाकडून दारूचे दुकाने बंद करण्यात येतात त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला शासनाकडून दारुची दुकाने बंद करण्यात यावी आणि राज्यात ड्राय डे घोषित करावा अशी मी आज शासनाकडे मागणी करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार यांनी देखील याची दखल घ्यावी अशी विनंती करत आहे. – हरिष बेकावडे, सामाजिक कार्यकर्ते -पेण

