ठळक बातम्याताज्या बातम्याराजकीय

पेण तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे पेणकरांच्या हक्काचे पाणी नवी मुंबईच्या घशात !

पेण तालुक्यातील हेटवणे धरण हे रायगड जिल्ह्यासाठी आहे की फक्त आणि फक्त नवीमुंबईसाठी ? हा प्रश्न पेणकरांना पडला आहे. कारण वर्षातील ८ महिने पाणीटंचाई असलेल्या पेणमधील काही आदिवासी वाड्या, पाडे आणि खारेपाट विभागाला हक्काच्या पाण्यासाठी वेळोवेळी संघर्ष करावा लागत आहे. तर दुसरीकडे पेण तालुक्यात असणाऱ्या विशाल काय हेटवणे धरणाचे पाणी नवी मुंबईकरांच्या घशात घालण्याचा डाव शासनाने आखला आहे. त्यासाठी मागील दोन वर्षापासून जमिनीला टनल बोअरिंग मशीनच्या माध्यमातून भगदाड पाडून जमिनी खालून सुमारे १०५ मीटर खोलीवर पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. महत्वाची बाब म्हणजे हे काम अत्यंत सावध आणि छुप्या पद्धतीने सुरू आहे. सिडको मार्फत मेघा इंजिनिअरिंग, व्ही टेक आणि एफकॉन या कंपन्यांना हे काम दिले गेले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेती खालून ही पाईपलाईन जात आहे त्या शेतकऱ्यांना पुसटशीही कल्पना शासन आणि प्रशासनाने दिलेली नाही.

पेण तालुक्यातील हेटवणे धरण ते जिते अशा १३ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनसाठी दोन ठिकाणी म्हणजेच जिते आणि बेलवडे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे १०० मीटर खोल आणि १२ मीटर रुंद विहिरीच्या आकाराचे होल जमिनीला पाडले आहेत आणि तिसरे होल हेटवणे धरणाच्या परिसरापासुन ३०० मीटर अंतरावर प्रस्तावीत आहे. सिडकोच्या माध्यमातून हे काम सुरु आहे. सिडकोच्या माध्यमातून नवीमुंबईला पाणी देण्याचा हा प्रकल्प असून या हेटवणे ते जिते या पहिल्या टप्प्यातील पाईपलाईन आणि जलशुद्दीकरण केंद्रासाठी सुमारे १०४२ कोटी रुपयांच्या निविदा निघाल्या आहेत. तसेच या प्रकल्पचा दुसरा टप्पा जिते ते वहाळ हा १५ किलोमीटरचा असून त्यासाठी सुमारे १२०० कोटी रुपयांचा खर्च अपॆक्षित असल्याची माहिती सिडकोचे उपअभियंता राजेंद्र पोतदार यांनी दिली. 

एकीकडे सुमारे २२०० कोटी रुपये खर्चून नवी मुंबईला पिण्याचे पाणी देण्यासाठी सरकार आणि प्रशासन एवढी तत्परता दाखवत आहे तर वर्षानुवर्षे पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. मात्र या संघर्षाला अद्याप यश येत नाही. पेण तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि नेते मात्र दरवर्षी उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाईचे राजकीय भांडवल करण्यातच धन्यता मानत आहेत. मात्र नवी मुंबईला जात असलेल्या पाण्याला थांबवण्याचे धाडस कोणताही लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते मंडळी दाखवत नसल्याने पेण तालुक्यातील नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेटवणे धरणाचे पाणी पेणच्या खारेपाट विभागाला मिळण्यासाठी वर्क ऑर्डर काढणे आवश्यक असतानाही सिडको करिता ऐवढी घाई का ? तसेच सिडकोच्या पाण्यासाठी पनवेलचे लोकप्रतिनिधी भांडतात मात्र येथील लोकप्रतिनिधी निद्रा अवस्थेत आहेत. २०१८ च्या धरण बचाव कायद्यानुसार धरण क्षेत्र परिसरापासून २०० मीटर अंतरावर कोणतीही खोदकाम करू असे असतानाही सदरचे खोदकाम हे कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. नंदा म्हात्रे – सामाजिक पेण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!