लोकल

महामार्गासाठी वापरलेले कॉक्रिट आणि डांबर पावसाच्या पाण्यात विरघळले !

पेण दि. १९ (अरविंद गुरव) – गेली १७ वर्षे सुरु असलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम कासवापेक्षा ही संथ गतीने सुरु आहे. पेण ते वडखळ या मार्गाचे काम मे पर्यंत बऱ्यापैकी झाले होते. मात्र पावसाळ्यात या रास्त्याची वाताहात झालेली आहे. मुजोर ठेकेदार, बेफिकिर अधिकारी आणि ढिम्म राजकारणी नेते मंडळींच्या दुर्लक्षामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे खड्यांचे विघ्न प्रवाशांच्या वाहनाच्या चाकाखालुन अजूनही संपलेले नसून आजही या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी अर्धवट काँक्रिटीकरण करून काम सोडून दिले आहे. साइडपट्टयां अर्धवट अवस्थेत आहेत. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबई आणि महानगरांतून कोकणात आपल्या गावाकडे गणेशोत्सवासाठी जाताना या गणेशभक्तांना विविध प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. विशेष म्हणजे या महामार्गावरील खड्डे भर पावसात भरण्याची ठेकेदाराने लढवलेली शक्कल पूर्णपणे फेल गेली असून खड्ड्यात टाकलेली डांबर अणि खड़ी पाण्याने विरघळली की काय? अशा प्रकारची चर्चा प्रवास करत असणारे प्रवासी करताना दिसत आहेत.

मुंबई – गोवा महामार्गाचा पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा २०११ साली सुरू झाला. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमानी व प्रवाशांना आनंद झाला होता. मात्र, महामार्गाच्या कामाला १७ वर्ष पूर्ण होत आली. तरी प्रवाशांना सुखकर प्रवास करण्याचा आनंद अजूनही नॅशनल हायवे व प्रशासनाने प्रवाशांना दिलेले नाही. दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की बांधकाम मंत्री, संबंधित नेते, स्थानिक आमदार आदी लोकप्रतिनिधी या महामार्गाची पाहणी करून गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे भरण्यात येणार असल्याची केविलवाणी घोषणा करत असतात. मुंबई-गोवा महामार्गाने रोज प्रवास करणाऱ्या चालकांना, प्रवाशांना पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी यासारखे आजार जडले आहेत. मात्र नेहमीची येती पावसाळा या उक्तीप्रमाणे दरवर्षी या महामार्गावरून गणेशभक्तांना खड्यांतून प्रवास करावा लागत असल्याने या लोकप्रतिनिधींबाबत देखील प्रवासी आणि वाहन चालक नाराजी व्यक्त करत आहेत.

मुंबई – गोवा महामार्ग बनविण्यासाठी वापल्या जाणाऱ्या सीमेंट काँक्रिट, रेती, खड़ी आणि इतर सामनाचा दर्जा तपासनारी यंत्रणा महामार्ग प्राधिकरणाकडे आहे का ? महामार्ग प्राधिकरणाकडे असणारे अभियंत्यांच्या कामकरण्याच्या प्रणालीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पूर्वी मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा ठेका हा डांबरापासून बनविण्याचा काढण्यात आला होता. डांबर आणि कामाच्या सुमार दर्जामुळे या अर्धवट बनलेल्या महामार्गाला वारंवार खड्डे पड़त असल्याने येथील राजकारणी आणि नेते मंडळींना हा महामार्ग सीमेंट कॉक्रीटच्या निर्मितीमध्ये रस असल्याने या महामार्गाच्या कामाचा ठेका ३-४ पटीने वाढवून मागील दोन वर्षा पासून काँक्रिटिकरणाच्या कामाने वेग घेतला. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या महामार्ग प्राधिकरणाने या सीमेंट काँक्रिटची गुणवत्ता तपासण्यास वेळ मिळत नसल्याने या मार्गाची अक्षरक्ष वाताहात झालेली आहे.

महामार्गासाठी लागणाऱ्या सीमेंट काँक्रिट आणि इतर साहित्याच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी शासनाकडून लॉयन इंजीनियरिंग या कंपनीला ठेका देण्यात आला आहे आणि या कंपनीकडून योग्यत्यावेळी कामाच्या दर्जाची तपासणी होत आहे. मागील गणेशोत्वाच्या वेळी तयार करण्यात आलेल्या महमार्गावरील काही टप्प्यांचे काम वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून करण्यात आले होते. मात्र महामार्गावर वापरलेले काँक्रिट सुकण्याचा कालावधी कमितकमी १४ दिवसांचा आहे परंतु रस्त्याचे काम केल्यानंतर अवघ्या काही तासांतच या काँक्रिट रस्त्यावरून वाहतूक सुरू केली असल्याने सदरील रस्त्यावरील सिमेंट आणि रेती उडून गेले आहे आणि त्याचीच डागडूजी आता ठेकेदार करीत आहे. संबधित ठेकेदाराला या महामार्गाचा मेंटेनन्स पुढील १० वर्ष करनेचा आहे त्यामुळे महामार्गावरील डागडुजीचा खर्च संबंधित ठेकेदार करत आहे. – यशवंत घोटकर, प्रकल्प अधिकारी, मुंबई-गोवा महामार्ग

(गणेशभक्तांचा प्रवास सुकर होण्यासाठी खा.सुनील तटकरे यांचा मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी दौरा

दरवर्षी गणेशउत्सवा करिता देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो चाकरमानी कोकणात येतात. गणेशउत्सवा करीता कोकणात येणाऱ्या भाविकांकरिता मुंबई गोवा मार्गावरील प्रवास सुकर होण्याच्या दृष्टीने रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा पहाणी दौरा आज होत आहे. यावेळी मुंबई गोवा महामार्ग प्रकल्पाच्या सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!