पेण येथे कृषी तरंग २०२६ कृषी प्रदर्शन संपन्न !
जेएसडब्लू व वनराई संस्थेचा संयुक्त उपक्रम.
राजेश प्रधान, पेण
पेण तालुक्यात वनराई व जेएसडब्लू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. ‘कृषी तरंग २०२६’ या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या कृषी प्रदर्शनाचे आयोजन सिसाँम रिव्हरसाईड, पेण येथे करण्यात आले होते. या कृषी प्रदर्शनात पेण तालुक्यातील शेतकरी,महिला बचत गट व उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन सत्यजित बडे (आयएएस), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी वनराईचे विश्वस्त सागर धारिया, वनराईचे सचिव अमित वाडेकर, जेएसडब्लू स्टील (डोलवी) चे उपाध्यक्ष आत्माराम बेटकेकर, जेएसडब्लू फाउंडेशन चे सामाजिक दायित्व प्रमुख सुधीर तैलोंग, जेएसडब्लू फाउंडेशनच्या Water, Environment and Sanitation विभागाच्या प्रमुख श्रीमती रूपा दावणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, मत्स्यशेती, दुग्धव्यवसाय आदी विषयांवर विविध कार्यशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. शेतीसाठी आवश्यक असलेली अवजारे, खते व औषधे, महिला बचत गटांचे व्यवसाय, विविध शासकीय विभाग व त्यांच्या योजनांचे प्रदर्शनही या ठिकाणी मांडण्यात आले होते या कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळून शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मदत होईल, असा विश्वास आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.



