प्रांत कार्यालयावर आदिवासींचा मोर्चा !
ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने मोर्चाचे आयोजन.

प्रतिनिधि, पेण
पेण तालुक्यातील आदिवासींच्या विकास निधीचा गैरवापर करणाऱ्या रा.जि.प. बांधकाम उपविभाग, पेण यांच्यावर दंडात्मक कारवाई करून उंबरमाळ, खौसावाडी, काजुचीवाडी केळीचीवाडी, तांबडी, माळवाडी येथील आदिवासी वाड्यांचे रस्ते बनविणे, शाहपाडा धरणवाडीलां गावठाण मंजूर करून घरकुल योजना राबविण्यात यावी. यासह ग्रुप ग्रामपंचायत दुष्मि-खारपाडा आणि खरोशी ग्रामपंचायत हद्दीतील खैरासवाडी, वडमालवाडी आदिवासीवाडील लागून असलेल्या बेकायदेशीर दगड खाणी बंद करून दोन्ही वाड्यांचे रस्ते बनविणे यासह इतर मागण्यांसाठी दिनांक १६ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पेण यांच्या कार्यालयावर ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही पेण तालुक्यातील उंबरमाळ, केळीचीवाडी, खौसावाडी, काजुचीवाडी, तांबडी ह्या पाचही आदिवासी वाड्यांतील आदिवासींना विकास तर सोडाच पण साधा मतदानाचा हक्कही नव्हता ही बाब एक वर्षापूर्वी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनात आल्यानंतर संबंधित विभागांना पत्रव्यवहार मोर्चे, आंदोलनांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर याबाबतचा तारांकित प्रश्नही विधान सभेत विचारला गेला. त्यानंतर येथील आदिवासी बांधवांच्या वाट्याला आलेले रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना अजूनही वाड्यापर्यंत पोहोचल्या नसल्यामुळे येथील आदिवासी वाड्यांतील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंते आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे ७८ वर्षापासून भोगत असलेला हा वनवास काही केल्या संपत नसल्याचे चित्र दिसत आहे. म्हणूनच आदिवासी बांधवानी हा मोर्चा काढून आपल्या व्यथा शासनासमोर माडण्याचा निर्णय घेतला.
या आहेत मागण्या –
- खवसावाडीच्या रस्त्यासाठी वापरलेला सुमारे ६० लाख रुपयांचा रस्ता शोधून द्या, अन्यथा रस्त्यासाठीचा निधी कुठे गेला याची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि रा.जि.प. बांधकाम उपविभाग पेणचे अभियंत्यांवर कारवाई करा.
- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर पेण ते खवसावाडी ह्या रस्त्याचे कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू न करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून ठेकेदारास पाठीशी घालणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग पेण येथील अभियंतांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
- पाचही आदिवासी वाड्यांना वन हक्क कायदा २००६ अन्वये ३/१ वैयक्तीक व ३/२ नुसार सार्वजनिक जमिनीसाठी प्रस्ताव तयार करण्यात यावे.
- उंबरमाळ येथे समाज मंदिर व अंतर्गत रस्ते तयार करण्यात यावे.
- वरची तांबडी येथे समाज मंदिर व सभा मंडप बांधण्यात यावे.
- वरची तांबडी, खालची तांबडी आणि खवसावाडी येथे अंतर्गत रस्ते बनविण्यात यावे.
- पेण तहसील कार्यालयात आदिवासी बांधवांचे सुमारे ३५० जातीच्या दाखल्यांचे अर्ज मागील एक वर्षांपासून पडून आहेत ते मंजूर करण्यात यावे जेणेकरून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल.
- उंबरमाळ आदिवासीवाडी येथील जि.प.प्राथमीक शाळेची इमारत पूर्णतः मोडकळीस आली असून अशा धोकादाय इमारतीमध्ये १ ली ते ४ थी ची मुले शिक्षण घेत आहेत त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी शाळेची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी.
- पेण ते उंबरमाळ, केळीची वाडी ह्या रस्त्यास मंजूर तीस लाख रुपये निधी ची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि रा.जी.प. बांधकाम उपविभाग पेण अभियंत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
- ग्रुप ग्रामपंचायत दुष्मि -खारपाडा हद्दीतील खैरासवाडी आदिवासी वाडीच्या आजूबाजूला असलेल्या बेकायदेशीर दगड खाणी आणि स्टोन क्रशर्समुळे आदिवासींच्या घरांना तडे जात असून आणि होणारे ब्लास्टिंग आणि धुळीमुळे आदिवासी बांधवांचे जगणे मुश्किल झाले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह खनिज कर्म विभागाला लेखी तक्रारी देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने संबंधित महसूल विभागाचे अधिकारी व बेकायदेशीर दगड खाणी आणि स्टोन क्रशर्स चालवणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात यावे.
- खारपाडा-सावरोली राज्यमार्ग ते खैरासवाडी आदिवासी वाडी चा रस्ता तात्काळ बनवण्यात यावा.
- खारपाडा-सावरोली राज्यमार्ग ते वडमालवाडी आदिवासी वाडीच्या रस्त्यात सत्ता बनविण्यात यावा.
- वडमालवाडी येथील जल जीवन मिशन योजनेस वाढीव निधीची उपलब्धता तात्काळ करण्यात यावी.
- मालवाडी आदिवासी वाढीचा रस्ता तात्काळ तयार करण्यात यावा.
- शहापाडा धरणवाडीला गावठाण मंजूर करून घरकुल योजना राबविण्यात यावी या सारख्या आदिवासी नागरिकांच्या मागण्यांसाठी बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दांडाधिकारी पेण यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती बिरसा ब्रिगेड संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील वाघमारे आणि पेण तालुकाध्यक्ष जितेंद्र वाघमारे यांनी दिली.




