भक्ति

स्वामींच्या समाधी मठात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात

हजारो भाविकांनी घेतला दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ

राजमुद्रा न्यूज़ नेटवर्क – अक्कलकोट

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मठात हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप, भजन संध्या आणि प्रवचनासह विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांनी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली, गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी महाराजांच्या मूर्तीसह संपूर्ण माधाऱ्याला आणि समाधी मठ मंडपाला फुलांची आकर्षक आरास आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

रविवारी पहाटे साडेचार वाजता काकड आरती करण्यात आली. त्यानंतर लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. सकाळी साडेदहा वाजता वस्त्रालंकार पूजा करण्यात आली. दुपारी बारा वाजता महापूजा करण्यात आली. यावेळी महानैवेद्य आरती (धुपारती) करुन भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री चोळप्पा महाराज यांचे वंशज अनिल पांडुरंग महाराज पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनुप महाराज पुजारी आणि परिवार यांच्यावतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मठ परिसरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसाद देण्यात येत होता. दिवसभर सुमारे १५ हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचे अनुप पुजारी यांनी सांगितले. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने श्री स्वामी समर्थाच्या मठामध्ये दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. यंदाच्या वर्षीच्या गर्दीने पूर्वीचे सर्व रिकॉर्ड मोडीत काढले होते. मठ परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते. पूजा साहित्य, प्रतिमा व प्रसाद विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण होते. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुप महाराज, संदेश महाराज व समस्त पुजारी परिवार, सेवाभावी सदस्य, सेवेकरी भक्त मंडळी आदींनी परिश्रम घेतले.

परंपरा कायम

मुळ पुरुष श्री स्वामी समर्थ महाराज यांचे परमभक्त श्री चोळप्पा महाराज यांनी सुरू केलेली श्री गुरु महाप्रसाद वाटप सेवा गेल्या अनेक वर्षांपासूनची आम्ही अखंडितपणे सुरू ठेवली आहे. स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी श्री गुरु महाप्रसाद वाटपाची परंपरा अशीच निरंतरपणे सुरू ठेवणार आहे. – अनुप महाराज पुजारी (श्री चोळप्पा महाराज यांचे वंशज)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!