“नवशक्ती” च्या संपादक पदी प्रकाश सावंत यांची नियुक्ती.

राजमुद्रा न्यूज नेटवर्क, मुंबई
दैनिक ‘नवशक्ती’ च्या संपादकपदी प्रकाश सावंत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील निर्व्हाळ गावचे सुपुत्र व कला शाखेचे पदवीधर असलेल्या प्रकाश सावंत यांनी दैनिक सामनाच्या २३ जानेवारी १९८९ रोजीच्या पहिल्या अंकापासून आपल्या पत्रकारितेला प्रारंभ केला. १ जुलै १९९१ रोजीपासून ते नवशक्तीमध्ये कार्यरत असून त्यांनी उपसंपादक, वार्ताहर, वरिष्ठ वार्ताहर, सहाय्यक संपादक, कार्यकारी संपादक अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मुंबई महानगरपालिका, न्यायालय, मंत्रालय व विधिमंडळात त्यांनी वार्ताहर म्हणून काम केले आहे. महापालिका दर्पण, परिसर, फेरफटका, दुसरी बाजू अशी लोकप्रिय सदरे त्यांनी लिहिली आहेत.
मुंबईच्या भिकाऱ्यांवरील ‘माणसापलीकडील माणसे,’ कचरा वेचकांच्या जीवनावरील ‘कथा आणि व्यथा’, नर्सेसच्या ‘कळा आणि झळा’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मुंबई, बहुढंगी मुंबईशी एकरूप झालेले जाती-धर्म आणि समाज, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे अंतरंग, उपेक्षित, वंचित व दुर्लक्षित समाज घटकांच्या प्रश्नांसह विविध नागरी प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांवरही त्यांनी आवाज उठवला आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळासह राज्य शासनाच्या विविध महत्त्वाच्या समित्यांवर त्यांनी काम केले आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी २०१० मध्ये काम पाहिले आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, बिहार, जम्मू काश्मीर व ओदिशासह विविध राज्यांचे अभ्यास दौरे करून त्यांनी तेथील नागरी प्रश्नांवर भाष्य केले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचा अप्पा पेंडसे पुरस्कार (२००१, २००५), महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा आचार्य अत्रे पुरस्कार (२००३, २००४) यासह विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.

