विद्यार्थ्यांनो मोबाईल पासून दूर राहा; जीवनाचा आनंद घ्या – राहुल पाटील, उपवनरक्षक
अक्षर विद्यालय येथे केक कापून झाडांचा २५ वा वाढदिवस साजरा.
प्रतिनिधी, पेण
शालेय जीवनातील हरवलेले दिवस पुन्हा येत नाहीत. म्हणून विद्यार्थ्यांनी टिव्ही, मोबाईल पासून दूर राहून सण, उत्सव आणि खेळ खेळून जिवनाचा मनमुराद आनंद घ्यावा. असे प्रतिपादन रायगडचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले.

हमरापूर – पेण येथील अक्षर विद्यालयात वृक्षारोपण व वृक्ष वाढदिवस कार्यक्रम नुकताच साजरा झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपवनसंरक्षक राहुल पाटील व शाळेचे संस्थापक, अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते. उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून २५ वा वृक्ष वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाला परीक्षेत्र वनअधिकारी. सपना सोनार, गट शिक्षणाधिकारी अरुणा मोरे, आदी उपस्थित होते. राहुल पाटील पुढे म्हणाले, गेली २५ वर्षे ही शाळा वृक्षारोपण करीत आहे. अशा फार थोड्या शाळा असे उपक्रम राबवतात. झाडे लावताना त्यामागची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजली आणि झाडा विषयी, निसर्गा विषयी प्रेम निर्माण झाले तर भविष्यात देशाची ही सक्षम पिढी निर्माण होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमते बरोबर शारीरिक क्षमताही वाढली पाहिजे. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या कमकुवत दिसतो. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखणे गरजेचे आहे, असे ही ते म्हणाले. २५ वा वृक्ष वाढदिवस या परीसरातील वाढलेली झाडे पाहून राहूल पाटील यांनी समाधन व्यक्त केले. या शाळेतील विद्यार्थी गेली २५ वर्ष वृक्षारोपण करतात. त्यांचे संवर्धन करतात. त्यामुळे हा परिसर निसर्गरम्य झालेला आहे. यामुळे हि शाळा इको-फ्रेंडली स्कूल म्हणून ओळखली जाते. या परिसरात आतापर्यात सुमारे ५० हजार झाडे लावून ती जगवली आहेत. येथे लावलेली झाडे जगवण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी झाडांचा वाढदिवस विद्यार्थी साजरा करतात. यावर्षी उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या हस्ते केक कापून झाडांचा २५ वा वाढदिवस साजरा केला गेला.

या वेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला दहावीतील प्रथम क्रमांक उत्तीर्ण झालेला विद्यार्थी स्वर्णिक प्रतिक म्हात्रे द्वितीय क्रमांक स्वरूप दिलीप पाटील तृतीय क्रमांक सिद्धेश सुरेश घरत या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही राहुल पाटील यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाला, माजी सरपंच प्रदीप म्हात्रे, केंद्रप्रमुख प्रमोद पाटील, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी भोईर तसेच पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक रामचंद्र पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय खरजेसर यांनी केले.



