“बेल महोत्सव” उत्साहात साजरा.
प्रतिनिधी, पेण
बेल आणि शिव यांचा प्राचीन काळापासून संबंध आहे . प्रत्येक शुभकार्यात बिल्व पत्राचा वापर केला जातो. बेल ही पूर्ण भारतीय वनस्पती आहे. वातावरणामध्ये हवामानातील शुद्धीकरणाचे कार्य बेल वनस्पती करते. बेलाच्या फळांचा सुगंध हा चंदनासारखा येतो. पडसे, खोकला, दमा ,ताप-कफ, पोटदुखी, मधुमेह, अस्थमा, रक्तशय, अशक्तपणा, जखम, सूज, बद्धकोष्ठता, उच्च रक्तदाब, कावीळ, अतिसार आदी आजारांवर बेल वनस्पती उपयोगी ठरते. तसेच गर्भवती महिलांसाठी बेल वृक्ष फार महत्त्वाचा आहे. बेल फळांमध्ये कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्व, खनिजे, (कॅल्शियम फॉस्फरस, पोटॅशियम, लोह,) तंतुमय पदार्थ इत्यादींचा समावेश असून जीवनसत्व ए.बी.सी. चे प्रमाण सर्वात जास्त आढळून येते. लगद्याला रंग व सुगंध येण्यासाठी या वनस्पतींचा वापर करतात.
बेलाची पान व फळं अनेक जुन्या आजारांवर औषध म्हणून उपयोगी येतात. परंतु ही सर्व औषधे आपल्या जवळचे वैदू व आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत. कारण कुठल्या आजारावर कशा प्रकारची औषधं आहेत ते डॉक्टर सांगू शकतात. श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी बेलाचे झाडांचे पान म्हणजे बिल्वपत्र महादेवाच्या पिंडीवर अर्पण केली जातात. मात्र बेलाची झाडं खूप दुर्मिळ असल्यामुळे या झाडांचे संवर्धन व त्या झाडाचे महत्व लोकांना सांगणे फार गरजेचे आहे. बेलाच्या पानांचा उपयोग केवळ सण, उत्सव, श्रावणी सोमवारी वापर करून त्या झाडाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे भविष्यात बेलाची झाड नष्ट करण्यासारखं आहे. म्हणून दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये श्रावणातील पहिला सोमवार हा “बेल महोत्सव” म्हणून पेण शहर तालुक्यामध्ये साजरा केला जातो. समुद्रमंथनातील हलाहल विष पचवून महादेवाने मानवासहित सर्वसृष्टीचे रक्षण केले .या कलियुगात प्रदूषणाने निर्माण होणारे कार्बनडाय-ऑक्साइड सारखे विष शोषून सर्वसृष्टीला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन प्राणवायू सारखे अमृत देणारे महादेव म्हणजे वृक्ष. म्हणून झाडांचे महत्त्व ओळखून केवळ सण उत्सवाला झाडांची पान, फळ फांद्या न ओरबडता त्या झाडांचं संवर्धन करणे महत्त्वाचे आहे आणि म्हणून बेल वृक्षांचं मोफत वाटप दरवर्षी वृक्षमित्र उदय मानकवळे व सौ. मनोरमा मानकवळे यांच्याकडून केले जाते. अनेक शाळांमध्ये झाडांचे महत्त्व सांगून बेलाची रोपे मोफत दिली जातात.
हा बेल महोत्सव श्रीमती सुमतीबाई देव प्राथमिक विद्यालय पेण या शाळेमध्ये बेल वृक्षांचे वाटप करून आनंदामध्ये साजरा करण्यात आला. या वेळी मनोरमा मानकवळे , प्राचार्या. घोडके, पडळकर सर रणपिसे सर, जाधव सर, वारगुडे सर, सौ. तांबोळी मॅडम व इतर शिक्षक हजर होते.



