युवकाने चाकुच्या सहाय्याने स्वतःच्या गळ्यावर करून घेतला वार ; पनवेल शहर पोलीस नातेवाईकांच्या शोधात.
संजय कदम, पनवेल
पनवेल शहरात आज सकाळी थरारनाट्य घडून अज्ञात युवकाने अज्ञात कारणावरुन चाकूच्या सहाय्याने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतला आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी सदर तरुणाला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल केले आहे. या मुलाची अद्याप ओळख पटली नसल्याने तसेच तो बोलण्याच्या स्थितीत नसल्याने त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
पनवेल शहर पोलीस ठाण्यात अंमलदार कर्तव्यावर पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे या असताना ठाणे अंमलदार कक्षात त्यांना माहिती मिळाली की, शहरातील गुन्हे शाखा कक्ष-२ समोर एका युवकाने चाकूच्या सहाय्याने स्वतःच्या गळ्यावर वार केला असून तो गंभीर जखमी आहे याप्रमाणे माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ बीट मार्शल दोन यांना पाचारण करून जखमी युवकास उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराकामी दाखल केले. उपजिल्हा रुग्णालय येथे त्या स्वतः जाऊन वैद्यकीय अधिकारी यांच्याशी युवकाच्या तब्येतीविषयी विचारपूस केली असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यास एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे घेऊन जाण्याबाबत सांगितले असता पोलीस हवालदार सातामकर व पोलीस हवालदार कारंडे यांना सदर जखमी युवकास एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे घेऊन पाठविले. सदर जखमी युवक हा काहीतरी नशा केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे तसेच त्याचे गळ्यावर वार असल्याने तो जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याने त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. या संदर्भात कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी २७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे यांच्याशी संपर्क साधावा.




