जेएसडब्लूच्या तिसऱ्या प्रकल्पाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा !
स्थानिक तरुणांना नोकरी आणि व्यावसायामध्ये प्राधान्य कंपनीने द्यावे – जिल्हाध्यक्ष – जितेंद्र पाटील
प्रतिनिधी, पेण
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम मराठी माणसाला प्राधान्य दिले असून येणाऱ्या उद्योगधंद्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्र असला पाहिजे या भूमिकेमुळे पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीच्या फेज ३ मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा ही सर्वप्रथम मागणी मनसेची असून कंपनीच्या वाढत्या विस्तारीकरणाला पाठिंबा असल्याचे मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी वडखळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
तालुक्यातील या भागामध्ये जेएसडब्ल्यू कंपनी ही एकमेव कंपनी असून या कंपनीमुळेच येथील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळत आहे. तर कंपनीच्या माध्यमातून या भागातील विकास कामांना गतीही मिळत आहे. त्यामुळे या भागात आमच्या पक्षाचे काही माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच कार्यकर्ते यांच्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून पाहिले असता त्यांना याचा फायदा होणे आवश्यक आहे. त्यामुळे मराठी तरुणांसाठी मनसे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून कंपनीचा फेज ३ वाढत असेल तर यामध्ये स्थानिक भुमीपुत्र सुद्धा वाढला पाहिजे परंतु आपल्या अधिका-यांच्या मार्फत येथील भूमिपुत्रांना आणि पर्यावरणाला कुठेतरी छेद लागत असेल तर राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार याबाबत आंदोलनाची भूमिका सुद्धा आखली जाईल तेव्हा कंपनी वाढत असेल तर येथील आमचा भूमिपुत्र सुद्धा वाढला पाहिजे त्यालाही रोजगार उद्योगधंदे मिळाले पाहिजेत ही भूमिका मनसेची सर्वप्रथम आहे.
कंपनीच्या वाढत्या विस्तारीकरणाच्या जनसुनावणीला मनसेचा पाठिंबा असल्याचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी शेवटी सांगितले. यावेळी पेण तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, वडखळ शाखा अध्यक्ष नरेश म्हात्रे, वडखळ-वाशी विभाग अध्यक्ष कुणाल म्हात्रे, जिल्हा वाहतूक संघटक अंकुश म्हात्रे, उपतालुकाध्यक्ष पांडुरंग तुरे, विनोद गावंड आदि कार्यकर्ते उपस्थित होते.



