ताज्या बातम्या

५ हजारांची लाच भोवली!

महावितरणचा उपकार्यकारी अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात

प्रतिनिधी, पेण

सध्या रायगड जिल्ह्यात महावितरणाचे महावितरण विभागाचे तीन-तेरा वाजले असल्याचे चित्र दिसत आहे. वेळोअवेळी केव्हाही विज पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे पेण तालुक्यातील गणपती कारखानदार आणि इतर छोटे-मोठे व्यावसायिकांना आर्थिक भुदंड सोसावा लागतो. मात्र महावितरणाचे काही अधिकारी आपले खिसे भरण्यात व्यस्त असल्याचे चित्र पेण महावितरण कार्यालयात दिसत आहे.

आज पेण येथील महावितरण कार्यालयातील लोकसेवक उपकार्यकारी अभियंता संजय जाधव याला ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या नवीमुंबई खात्याने रांगेहात पकडले. या बाबत मिळालेल्या माहिती नुसार खालापुर येथील तक्रारदाराच्या मालकीचे जागेमधून महावितरण विभागाचे विद्युत उच्चदाबाच्या वाहिन्या गेलेल्या असुन सदरच्या वाहिन्या या एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर स्थंलातरीत करण्याकरीता जागा मालक यांनी तक्रारदार यांची पत्नीचे नावे असलेल्या मे. शाक्य ईटरप्रायसजेस, या कंपनीस काम दिले होते. सदर काम करुन घेण्याबाबतचे अधिकारपत्र मे. शाक्य ईटरप्रायजेस च्या वतीने तक्रारदार यांना दिले होते. सदर कामाचा तांत्रिक परवाना पेण म.रा.वि.वि.कं.लि पेण सर्कल, जि.रायगड या कार्यालयात प्रलंबित होता. सदर परवाना लवकरात लवकर मिळण्याकरिता तक्रारदार यांनी जमिनमालक यांचे वतीने सदर कार्यालयातील उपकार्यकारी अधिकारी संजय जाधव यांना भेटून सदर कामाचा तांत्रिक परवाना लवकरात लवकर मिळण्याकरीता विनंती करुन अर्ज सादर केला होता. सदर तांत्रिक परवाना देणेकरीता संजय जाधव याने तक्रारदार यांचेकडे रुपये ५ हजारांच्या लाचेच्या रकमेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी ७ जुलै रोजी रोजी अँटी करप्शन ब्यूरो, नवी मुंबई कार्यालयात तक्रार दिली होती. त्या तक्रारीचे अनुषंगाने शासकीय पंचासमक्ष आज ८ जुलै रोजी केलेल्या लाचेच्या सत्यता पडताळणी दरम्यान संजय जाधव याने तक्रारदार यांचेकडे प्रलंबित कामची पुर्तता करून देणेकामी रू. ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नवीमुंबई लाचलूचपत विभागाने रचलेल्या सापळ्यात रुपये ५ हजारांची लाच घेताना पेण येथील सर्कल कार्यालयात उपकार्यकारी अभियंता संजय जाधव याला रांगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरील कारवाई पो. नि. अरुंधती येळवे, पोना विशाल अहिरे, म.पो.ना. प्रमिला विश्वासराव, म. पो. ना. उमा बासरे, पो. शि. निखिल चौलकर, म.पो.शी योगिता चाळके यांच्या पथकाने शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे, संजय गोवीलकर, अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे आणि सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे यांच्या मार्गदर्शनात पार पाडली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!