सामाजिक

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन पेण पोलीस वसाहतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा.

सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांची मागणी

प्रतिनिधी, पेण

पेण येथील पोलीस वसाहत फणस डोंगरी येथे असून जवळपास चार इमारती दोन बैठ्या चाळी यांची अक्षरश: उकिरड्यासारखी अवस्था झालेली आहे. अत्यंत अस्ताव्यस्त जागा असतानासुद्धा गेले कित्येक वर्षापासून निधी उपलब्ध नसल्याने तेथे जंगल निर्माण झाले आहे.

जवळपास ३५ वर्ष जुन्या या इमारती व चाळी असून शासन याकडे दुर्लक्ष करत आहे हे दुर्दैव आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात त्याच्यामुळे विषारी जनावरांचा वावर सुरू झाला आहे. यातून घटना घडल्यास जबाबदार कोण ? याचाही शासनाने विचार करावा. कायदा सुव्यवस्था त्याचबरोबर शांतता अबाधित राहण्याचे काम २४ तास पोलीस कर्मचारी करत असतात. मात्र पेण पोलीस ठाणे, वडखळ व जवळच्या ठाण्यातील पोलिसांना राहण्याची अत्यंत गैरसोय आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भूदंड भाड्यापोटी सोसावा लागतो. सन २०१९ पासून यासाठी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे सातत्याने प्रयत्न करून असून २०२१ ला सदरच्या नादुरुस्त इमारती व चाळी पाडण्याचे बांधकाम विभागाने पत्र दिलेले आहे. मात्र अद्याप निधी अभावी काम थांबले आहे. विशेष म्हणजे पेण पोलीस स्टेशनचे कार्यालय ज्या ठिकाणी आहे तेथे तहसील कार्यालय, वनविभाग कार्यालय व अन्य कार्यालये असून बाजारपेठेलगत असल्याने वाहतुकीची कोंडी पूर्ण दिवसभर सातत्याने जाणवते.

यावर उपाय म्हणून शासनाने तहसील कार्यालय हे प्रांत कार्यालयाच्या प्रशस्त जागेत दिल्यास लोकांची कामांची गैरसोय होणार नाही. त्याचबरोबर वाहतुकीची समस्या सुटेल. तसेच पोलीस ठाणे कार्यालयासाठी आणखी त्याच ठिकाणी जागा उपलब्ध होईल याचाही विचार करावा. पोलिसांना राहण्यासाठी घरे मिळण्यासाठी शासनाने तात्काळ निधी मंजूर करावा यासाठी रायगडच्या दोन्ही मंत्र्यांनी लक्ष घालावे.

याबाबत आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना तात्काळ पत्र देणार असून रायगडच्या कर्तव्यदक्ष आयपीएस दर्जाच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी याबाबत दखल घेतली असून लवकरच प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांना संदेशा द्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!