हुतात्मा नाग्या महादू कातकरी हे आदिवासींच्या अस्मितेचे प्रतीक – डॉ. वैशाली पाटील
आय.टी.आय. ला हुतात्मा महादु कातकरी यांचे नाव दिल्याबद्दल अंकुर ट्रस्ट तर्फे आभार
प्रतिनिधि, पेण
चिरनेर जंगल सत्याग्रहातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी हे आदिवासींच्या अस्मितेचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत शेतकरी, कामगार, आदिवासींचा प्रमुख सहभाग होता सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्याकाळी राहणाऱ्या कातकरी समाजाला सामाजिक स्वीकृती नव्हती तसेच प्रतिष्ठाही नव्हती. आजही त्याकरिता संघर्ष करावा लागत आहे असे उद्गार जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी काढले. त्या अंकुर ट्रस्ट या संस्थेच्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होत्या. या बैठकीत पेण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस हुतात्मा नाग्या महादू कातकरीचे नाव देण्याचा महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी अंकुर ट्रस्ट आदिवासी संघटनेच्या गावपातळीवरील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व आदिवासी शालेय विद्यार्थी उपस्थित होते. याबाबत शिक्षित आदिवासी युवकांनी आनंद व्यक्त करून आदिवासींच्या अस्मितेच्या चळवळीची दखल शासनाने घेतल्याबाबत समाधान व्यक्त केले.
याबाबत बोलताना आदिवासी महिला नेत्या निरा वीर म्हणाल्या की सण १९९७ मध्ये सर्वप्रथम अंकुर ट्रस्ट या संस्थेने या अनामिक हुतात्म्याच्या नावे मिरवणूक काढून स्मृतीस्तंबावर नाव कोरावे याकरिता मागणी केली होती. सन २००१ मध्ये डॉ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिरनेर येथे झालेल्या आंदोलनाची दखल घेऊन त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांनी चिरनेरच्या मूळ स्तंभावर नाव कोरण्याचे आदेश दिले. याबाबत पेणच्या भरचौकात आदिवासींनी साखर वाटून व पारंपारिक वाद्य वाजवून आपला आनंद व्यक्त केल्याची आठवण बाळाराम नाईक यांनी काढली. दरवर्षी पेण चिरनेर येथे आदिवासींची मिरवणूक व विविध प्रश्नाबाबत मांडणी हे गेले २५ वर्षापासून सातत्याने सुरू आहे. आता हुतात्मा नाग्याच्या स्मृतिपित्यर्थ दरवर्षी केवळ पेणच नाही तर रायगडमधील सर्व तालुके, ठाणे, जव्हार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्यातही कातकरी आदिवासी अभिमानाने रॅली काढतात व आपल्या हुताम्याचे स्मरण करतात. या चळवळीची दरवळ घेऊन महाराष्ट्र शासनाने पेण येथील आय.टी.आय. संस्थेस आपल्या हुतात्म्याचे नाव देऊन कातकरी आदिवासींची मागणी पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहे. तसेच या प्रशिक्षण संस्थेस जास्तीत जास्त आदिवासी युवकांनी शिक्षणाची संधी मिळेल ही अपेक्षा ही व्यक्त केली आहे.



